Mon, Aug 10, 2020 04:12होमपेज › Pune › गेला महामार्ग कुणीकडे, खड्डेच खड्डे चोहीकडे...

गेला महामार्ग कुणीकडे, खड्डेच खड्डे चोहीकडे...

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:44PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे महामार्गावर तात्पुरता पर्यायी एकेरी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे; मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे या पाऊण किलोमीटर अंतरात मोठ्या संख्येने खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमधून रस्ता शोधत आणि जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड या सुमारे 6.3 किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल ते शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना प्रवेशद्वार या पाऊण किलोमीटर अंतरातील उड्डाणपुलाचे काम मुदत उलटूनही धिम्या गतीने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा ताण पुलाखालून तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या पर्यायी रस्त्यावर पडू लागला आहे. मुळात हा रस्ता कच्चा असल्यामुळे आणि मागील दोन आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाच्या परिणामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. विशेषतः गुरुद्वाराजवळ बब्बी-दा-ढाबा परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. येथून थोड्याच अंतरावर व्यवहारे गॅरेज आणि माईल शूजसमोर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. 

संत तुकाराम हॉस्पिटल, रिपब्लिक शाळा, एचडीएफसी बँक, मोरया हॉटेल, सवाना चौक, तसेच उड्डाणपुलाच्या शेवटच्या टप्प्यातही खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या पाऊण किलोमीटर अंतरात सलग दोन मीटर अंतरात रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना हे खड्डे चुकविताना आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र आहे. या परिसरातून ताशी चाळीस किलोमीटर वेगानेही वाहन हाकणे अशक्य असल्याची प्रतिक्रया अनेक ट्रक चालकांकडून व्यक्‍त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी टे्रलरच्या धडकेने पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. त्या घटनेतही खड्ड्यांमुळे वारंवार ब्रेक लावल्याने ब्रेक निकामी झाल्याचा दावा चालकाने केला होता. 

एकंदरीतच या परिसरातून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात संबंधित कंत्राटदारांकडून सोपस्कार म्हणून सिमेंटमिश्रीत खडी खड्ड्यांमध्ये टाकण्यात आली होती. मात्र, वाहनांची  वर्दळ असल्यामुळे खडी उखडली व रस्त्यावर पसरली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकच नव्हेतर रस्त्याच्या कडेचे दुकानदारही वैतागले आहेत. मोठे वाहन थोडेजरी वेगात या खड्डयातून गेले तर खड्डयात साचलेले पावसाचे पाणी थेट दुकानात किंवा ग्राहकाच्या अंगावर उडते, अशी तक्रार व्यापार्‍यांनी केली आहे. 

शालेय विद्यार्थ्यांना मोठा धोका

देहूरोड येथे उड्डाणपूलाच्या कामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याची खड्ड्यांमुळे अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावर दिवसभरात अंदाजे साडेपाच हजार वाहने धावतात. त्यात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, मालवाहतूक आणि खासगी वाहनांचा समावेश आहे. अवजड वाहनांना बंदी असूनही या भागातून बिनदिक्कत अवजड वाहने नेली जातात. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय या भागातून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांचा राबता असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही या खड्डयांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.