Mon, Jul 13, 2020 23:45होमपेज › Pune › पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; लोहगावला सर्वांधिक झोडपले

पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; लोहगावला सर्वांधिक झोडपले

Last Updated: Oct 09 2019 8:08PM

परतीच्या पावसाने पुण्याला पुन्हा झोडपले.पुणे: प्रतिनिधी 

पुणे शहराला बुधवारी पहाटे व सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मध्यवर्ती भागासह दक्षिण, पश्चिम व पूर्व पुण्यात पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान धो-धो पाऊस पडला. गेल्या 24 तासात शिवाजीनगर 10.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाण येथे तब्बल 50.3 मिलिमीटर व लोहगाव येथे सर्वाधिक 66.2 मिलिमीटर पाऊस बरसला. दरम्यान, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी सायंकाळनंतर मेघगर्जनेसह दमदार पाऊस पडला.   

सायंकाळी साडेपाच वाजेनंतर काळेकुट्ट ढग दाटून आले व पावणे सहा वाजेपासून टपोर्‍या थेंबांनिशी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढगांमुळे सायंकाळी सहा वाजताच रात्री 8 वाजल्याचा फिल नागरिकांना आला. दक्षिण पुणे, मध्यवर्ती पेठा, पश्चिम पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता.  

पावसामुळे सखल भागात पाणी साठून वाहतूक कोंडी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे दीड तास पावसाचा जोर टिकून होता. मध्य महाराष्ट्रात असणारे चक्राकार वारे व द्रोणीय स्थितीमुळे शहरासह मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी सध्या दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याचे पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले. पुढील 3-4 दिवस शहर व परिसरात दुपारनंतर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. 

बाजीराव रस्ता परिसरात गारा

बाजीराव रस्ता परिसरात बुधवारी लहान आकाराच्या गारा पडल्या. सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास आप्पा बळवंत चौक, शनिवार वाडा, नारायण पेठ, शनिवार पेठ, आदी ठिकाणी सुमारे दहा मिनिटे लहान आकाराच्या गारा पडल्या. अन्य भागात मात्र गारा पडल्याचे वृत्त नाही.