Fri, Nov 27, 2020 22:04होमपेज › Pune › प्रेयसी रिक्षाचालकाबरोबर फरार; प्रेमभंग झालेल्या प्रियकराने तब्बल ८० मोबाईल..

प्रेयसी रिक्षाचालकाबरोबर फरार; प्रेमभंग झालेल्या प्रियकराने तब्बल ८० मोबाईल..

Last Updated: Aug 26 2020 7:46PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रेमभंग आणि प्रेमभंगाचे दु:ख भोगणारा प्रियकर यांचे अनेक भावनिक किस्से तुम्ही ऐकले असतील. ‘दिल’ तोडून जाणाऱ्या प्रेयसीला ‘बददुआ’ देणारे प्रियकरही तुमच्या पाहण्यात आले असतील. पण, प्रेमभंग झालेला शहरातील एक प्रियकर असा बहाद्दर निघाला की, प्रेयसीच्या ‘बेवफाई’चा बदला घेण्यासाठी त्याने चक्क ८० महागड्या मोबाईलची चोरी केली!

अधिक वाचा : वयाची पन्नाशी पार केलेल्यांना मुंबईत जास्त धोका! कोणत्या संदर्भात?

आसिफ नावाच्या या ‘आशिक’चा हा कारनामा खरेच थक्क करणारा आहे. आसिफ उर्फ भुरा शेख (वय ३७, सध्या रा. पूना कॉलेज जवळ, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी त्याची पूर्ण ओळख. आसिफची प्रेयसी अहमदाबादची. काही काळापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. सगळे बरे चालले असे आसिफला वाटत असतानाच, काही महिन्यांपूर्वी त्याच्या प्रेयसीचे एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. याची खबर आसिफला लागायच्या आतच तिने आसिफला गुंगारा देत त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला.

अधिक वाचा : पृथ्वीराज चव्हाणांकडून इशारा देणाऱ्या मंत्री सुनिल केदारांना प्रत्युत्तर

आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून जाते, म्हणजे काय? आसिफला जबर धक्का बसला. तो कासाविस झाला, खवळला. प्रेयसीने आपल्याशी ही प्रतारणा एका रिक्षाचालकामुळे केली, ही बाब त्याच्या खूपच जिव्हारी लागली. इतकी की, दुनियेतील तमाम रिक्षाचालक त्याचे ‘दुष्मन’ बनले. त्याने ठरवले, बदला घ्यायचा. पण प्रेयसीचा नव्हे, तर रिक्षाचालकांचा.

मग त्याने रिक्षाचालकांना ‘टार्गेट’ करणे सुरू केले. तो त्यांच्या मोबाईलची चोरी करू लागला. अनेक महागडे फोन त्याने चोरी केले. चोरी केलेल्या मोबाईलची संख्या ८० वर पोहोचली. त्याने केवळ पुण्यातीलच नव्हे, तर मुंबईतील रिक्षाचालकांचेही मोबाईल लंपास केले. त्याची माहिती पोलिसांना एका बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार लष्कर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्याने चोरीचे कारण सांगितल्यानंतर पोलिसदेखील चक्रावून गेले. आसिफने इतर कुणाचेही फोन न चोरता केवळ रिक्षाचालकांचे फोन चोरल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अधिक वाचा : दाऊदच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडला शिव्यांचा भाडिमार!

कात्रज, कोंढवा तसेच शहरातील विविध भागातून रिक्षांमधून प्रवास करताना आसिफ रिक्षाचालकांना हेरायचा. त्यांच्याकडे महागडे मोबाईल आहेत का? हे पहायचा. त्याचा प्लान तयारच असायचा. इच्छित स्थळी उतरल्यानंतर आपला मोबाईल घरीच राहिल्याची बतावणी करत एक फोन करण्यासाठी संबंधित रिक्षाचालकाकडून मोबाईल घ्यायचा. मोबाईलवर बोलत असल्याचा आव आणायचा. रिक्षाचालक गाडी बाजूला लावत असल्याचा फायदा घेत मोबाईल घेऊन पोबारा करायचा.
.

प्रेमभंग झाल्याने त्याचा बदला म्हणून हा चोरटा रिक्षाचालकांना टार्गेट करून त्यांचे महागडे फोन चोरत होता. त्याने ८० मोबाईल चोरले असून त्यापैकी १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
- चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे