Thu, Mar 04, 2021 17:07होमपेज › Pune › पुणे : पावसाच्या रिमझिम सरींमध्येही गणेश भक्तांच्या आनंदाला उधाण

पुणे : पावसाच्या रिमझिम सरींमध्येही गणेश भक्तांच्या आनंदाला उधाण

Published On: Sep 12 2019 9:50AM | Last Updated: Sep 12 2019 8:34PM

खजिना विहीर गणेशोत्सव मंडळाचा बालाजी रथपुणे : पुढारी ऑनलाईन

ढोल- ताशा पथकांचा अखंड गजर..., गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष..., जागोजागी रांगोळ्यांचा पायघड्या आणि रस्त्यांवर निघणाऱ्या भव्य मिरवणुकांसह पारंपरिक वस्त्रे परिधान करून भावपूर्ण वातावरणात आज, गुरुवारी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला पुणेकरांकडून निरोप दिला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. 

विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या स्वागताला लक्ष्मी रस्त्यावर सर्वत्र रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मोबाईल वापराचे दुष्परिणाम स्पष्ट करून सामाजिक संदेश ही या रांगोळ्यांमधून देण्यात आला आहे.

मानाचा तिसरा गणपती गुरूजी तालीम गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले आहे. नगरकर बंधूंचे सनई चौघडा वादन... नादब्रम्ह पथकाचा गजर...सोबतीला गुलालाची उधळण... मानवी कड्याचा कडेकोट बंदोबस्त...डोक्यावर गांधी टोप्यांची शान...अशा भव्य लवाजम्यासहा पुण्याचा राजा असलेला मानाच्या तिसऱ्या गुरूजी तालीम मंडळाने मिरवणुकीत सहभाग घेतला.

Live update :

टिळक रोडवर गर्दीचा महापूर 

पुणे : गजबजलेल्या टिळक चौकात (अलका टॉकीज) रुग्णवाहिकेला गणेश भक्तांनी क्षणात रस्ता करून दिला.

खचाखच भरलेल्या गर्दीतही सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका रुग्णवाहिकेला चौकातून रस्ता दिल्याने यातून पुणेकरांची जागरूकता दिसून येते.

आज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुमारे 4 ते 5 रुग्णवाहिकांचा अलका चौकातून वाट दिली आहे

पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन 

पुण्यात विसर्जनादरम्यान वरुणराजाची हजेरी

पुण्यात गणेश विसर्जन मिरावणुकीदरम्यान वरुणराजाने हजेरी लावली. सुमारे १० मिनिटे पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यामुळे कार्यकर्ते व नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला. गुरुवारी दुपारी ३.५० वाजेच्या सुमारास मध्यवर्ती भागात पाऊस पडला. अचानक ढग दाटून आले व किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. बाप्पाला निरोप देताना इंद्रदेवतेलाही जणू अश्रू अनावर झाले, अशी चर्चा रंगताना दिसली.

मानाच्या पहिल्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीचे टिळक चौकात आगमन


पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे टिळक चौकात (अलका टॉकीज) आगमन झाले आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्याकडून मानाचा नारळ स्वीकारल्यानंतर श्रींचे विसर्जन होईल. टिळक चौकात भाविकांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

कुमठेकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू

कुमठेकर रस्त्यावरील गणपती मिरवणुकीस जल्लोषात सुरुवात

गुलालाकरिता प्रसिद्ध असणाऱ्या या रस्त्यावर यंदा देखील गुलाल उधळला जात आहे. त्यामुळे अवघी तरुणाई गुलालमय

ढोल ताशाचा गजर, त्यावरील तरुणाईने धरलेला ठेका, भव्य, भव्य गणेश मूर्ती या रस्त्याचे आकर्षण

सोसायटी व घरगुती गणपती देखील या रस्त्याने मार्गस्थ 

कुमठेकर रस्त्यावरून यंदा एकूण ४६ मंडळे जाणार आहेत 

- टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक उत्साहात 

- लक्ष्मी रोडवरून मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता टिळक रोडवरूनही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी साडे अकरा वाजता उत्साहात मिरवणूक सुरू झाली. दरवर्षीच्या तुलनेत एक तास उशिराने मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशाच्या दणदणाटात टिळक रोडवर दांडेकर पूल येथील आझाद मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने ही सुरुवात झाली.

- सह्याद्री गर्जना ढोल पथकाने ताशाच्या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेत नागरिकांना खिळवून ठेवले.

- तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणूक...

-विसर्जन मिरवणुकांच्या सहभागानंतर गर्दीने ओसांडून वाहत असलेला बेलबाग चौक.

-चौघडा वादन करणारी निकिता लोणकर


- मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणेश मंडळाचे मंडई चौकात आगमन

- लक्ष्मी रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले...

-शहरातील मानाच्या व प्रसिद्ध गणपतींच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरुवात... 

- पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती मार्गस्थ

-फुलांची उधळण..., रंगोळीच्या पायघड्या...., ढोलताशाचा गजर..., सनई चौघडयाचे मंगलमय सुर अन बाप्पाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात वैभवशाली वैभवशाली मिरवणुकीला सुरूवात झाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची महापौर मुक्ता टिळक, विधान सभेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू झाली. 

-शहरातील महात्मा फुले मंडई समोरील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी खासदार गिरीश बापट, जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त सौरभ राव, भाजप पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ,उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे उपस्थित होते.