होमपेज › Pune › ठेकेदारीच्या वादातून माजी उपसरपंचाचा खून

ठेकेदारीच्या वादातून माजी उपसरपंचाचा खून

Last Updated: Dec 14 2019 1:43AM
राजगुरुनगर : प्रतिनिधी

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील ’सेझ’ प्रकल्पात ठेकेदारी मिळविण्याच्या कारणावरून काही युवकांनी माजी उपसरपंच असलेल्या युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. खेड तालुक्यात खळबळ उडवून देणारी ही घटना कनेरसर येथे शुक्रवारी (दि. 13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. खून झालेल्या युवकाचे नाव नवनाथ लक्ष्मण झोडगे (वय 36 , झोडकवाडी, कनेरसर, ता. खेड) असे आहे. तर मयूर तांबे व इतरांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवनाथ झोडगे कनेरसर येथील ‘सेझ’ प्रकल्पात  ए. डी. आर. कंपनीचे बांधकामाचे काम करीत होते. मयूर तांबे (रा. वरुडे, ता. खेड) हा मयत नवनाथ झोडगे यांच्याकडे कंपनीचे काम मागत होता. दोन दिवसांपुर्वी  या दोघांमध्ये कामावरून बाचाबाची झाली होती. शुक्रवारी 1 वाजेच्या सुमारास मयूर तांबे इतर 5 जण ए.डी.आर. कंपनीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आले. तिथे मयत नवनाथ झोडगे व मयूर तांबे यांच्यामध्ये पुन्हा बाचाबाची झाली. कंपनीच्या आवारातच नवनाथ झोडगे याच्यावर कोयत्याने डोक्यावर, पोटावर, हातावर सपासप वार केले. यामध्ये नवनाथ झोडगे जागीच ठार झाला. घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले.

मयत झोडगे यांना राजगुरूनगर लगतच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर नातेवाईकांनी आरोपी हजर करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आक्रमक नातेवाईक व ग्रामस्थांमुळे येथे काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

राजगुरुनगरपासून काही अंतरावर खेड सिटी (सेझ) मध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी कंपन्यांचा विस्तार वाढला आहे. त्यातून या परिसरात ठेकेदारीचे प्रस्थ वाढत असताना येथे गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात अनेक हाणामारी, धमकावणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवनाथ झोडगे यांच्या हत्येमुळे ’सेझ’ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात ठेकेदारीच्या कारणावरून खून होण्याची पहिलीच घटना आहे. या प्रकाराने सेझ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोध घेण्यासाठी  पोलिसांची  दोन पथके रवाना झाल्याचे सांगण्यात आले.