मुंबई : पुढारी ऑनलाईन
काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (ता.११) सर्व अपेक्षित चर्चांना पुर्णविराम देत भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार स्तुस्तीसुमने उधळली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, की कार्यकर्त्यांना अद्याप वाटत नाही की मी भाजपमध्ये आलो आहे. हा अन्यायग्रस्त समाज आहे, पण या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावे. आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही विकासाच्या मुद्यांवर या ठिकाणी आलो आहे. मी कुठलीही अट घालून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. मुख्यमंत्र्यांचा हसरा चेहरा आहे, आता त्यांच्याबरोबर हर्षवर्धन आला आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजारी नाही.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दोन खास विनंत्या केल्या. ते म्हणाले, आमच्या इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवा. आणखी एक विनंती आहे ती पुढे पुढे भेट झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा करता येईल. ते पुढे म्हणाले, प्रामाणिकपणे राजकारण करायचे असेल, तर भाजपाशिवाय पर्याय नाही. जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवेन आणि पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी जाहीर करून टाकली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी आला असता, तर खासदार झाला असता, अशा शब्दात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले.