Sun, Oct 25, 2020 08:26होमपेज › Pune › माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

Last Updated: Aug 05 2020 9:26AM
निलंगा : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुणे येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे २.१५ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज निलंग्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री होते.

निलंगेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. २ ऑगस्ट रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद (ता. निलंगा) येथे मामाच्या गावी त्यांचा जन्म झाला होता. अवघ्या सहा महिन्याचे असताना त्यांचे पितृछत्र हरवले. त्यांच्या मातोश्री वत्सलाबाईंनी मोठ्या धैर्याने व हिमतीने निलंगेकर यांचे संगोपन केले. गुलबर्गा येथे माध्यमिक, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात उच्च शिक्षण तर नागपूर विद्यापीठात त्यांनी पीएचडी मिळवली. १९५१ मध्ये धानोरा येथील सधन शेतकरी आप्पाराव धानूरे यांच्या कन्या सुशीलाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्यामागे चार मुले व एक मुलगी, जावई, सूना, नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. 

१९५५ पासून निलंगा येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली होती. १९६२ पासून ते राजकारणात पूर्णवेळ सक्रीय झाले. १९६२ पासून २०१४ पर्यंत ते या मतदारसंघातून तब्बल १० वेळा निवडून आले आहेत. या ५०-५५ वर्षांचा थक्क करुन टाकणाऱ्या या प्रदीर्घ कारकीर्दीत या लोकनेत्याने राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री अशी विविध पदे भूषवली. 

लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याचा कायापालट घडवून आणला. महसूल, पाटबंधारे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन आदी खात्यांची धूरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडून मराठवाड्याचा कायापालट केला. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष ठरली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी असलेले निलंगेकर राज्याच्या राजकीय पटलावर मितभाषी, शांत, सुस्वभावी व निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जात.

 "