Sat, Sep 19, 2020 07:24होमपेज › Pune › सासरा, मेहुण्याने काढला जावयाचा काटा 

सासरा, मेहुण्याने काढला जावयाचा काटा 

Last Updated: Aug 07 2020 1:04PM

संग्रहीत छायाचित्रआळंदी : पुढारी वृत्तसेवा 

आळंदी शहराच्या नजीक असलेल्या चऱ्होली खुर्द (ता.खेड) गावाच्या हद्दीत कौटुंबिक वादाच्या कारणावरून जावयाचा सासरा आणि मेहुण्यानेच जावयाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासरा आणि मेहुण्याने धारधार हत्याराने वार करत खून केला असून याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उदय सुनील लोखंडे (वय ३५) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. तर अधिक तपास सुरू असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली आहे.

याबाबत आळंदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत उदय आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणांवरून भांडण होत होते. उदयला दारूचे व्यसन होते. त्यावरूनही पती-पत्नीमध्ये सततचे भांडण होत होते. उदयची पत्नी आणि आरोपी यांचे म्हणणे होते की, उदय आणि त्याच्या पत्नीने वेगळे राहावे. दरम्यान, वारंवार होत असलेल्या भांडणावरून सासरा हनुमंत ज्ञानोबा सोनवणे व मेहुणा किरण हनुमंत सोनवणे (रा. कोडीत, ता. पुरंदर. सध्या रा. भैरोबा नाला, हडपसर) आणि इतर नातेवाईकांनी उदय यांच्यावर काठी आणि हत्याराने हल्ला केला. उदय यांच्या डोक्यात, हातापायावर, पाठीवर, कानाजवळ गंभीर दुखापत करून त्यांचा निर्घृणपणे खून केला. ही घटना बुधवारी (दि.५) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास वडगाव रस्त्यावरील, लक्ष्मी नगरयेथील संजय एकनाथ आहेर यांच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत घडली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात उदय यांच्या आईने श्रीमती अरुणा सुनील लोखंडे यांनी  फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार सासरा हनुमंत ज्ञानोबा सोनवणे व मेहुणा किरण हनुमंत सोनवणे (रा. कोडीत, ता. पुरंदर. सध्या रा. भैरोबा नाला, हडपसर) आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.

 "