Mon, Aug 10, 2020 04:00होमपेज › Pune › पुणे : विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

पुणे : विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

Last Updated: Jun 02 2020 3:29PM
मांडवगण फराटा (पुणे) : पुढारी वृत्तसेवा:

बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर, जि. पुणे) येथे विजेच्या धक्क्याने वडिलांसह मुलाचा दुदैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दत्तात्रय दगडू नागवडे (वय ५०) व प्रसाद दत्तात्रय नागवडे (वय १६) या दोघांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत, संतोष नारायण नागवडे यांनी मांडवगण फराटा पोलिस चौकीत फिर्याद दिली आहे. सविस्तर माहिती अशी, सोमवारी (दि. १) रात्री ९.४५ च्या सुमारास दत्तात्रय नागवडे व त्यांचा मुलगा प्रसाद नागवडे हे घरासमोरील अंगणात काही काम करीत होते. दत्तात्रय यांचा खांबावरून आलेल्या तारेला स्पर्श होताच त्यांना शॉक बसला. ते पाहून जवळच असलेला प्रसाद वडिलांना वाचविण्यासाठी पुढे गेला तर तोही तारेला चिकटला. घरासमोर एकच आरडाओरडा झाल्याचे ऐकून दत्तात्रय यांचे चुलत भाऊ संतोष नारायण नागवडे हे धावत तेथे गेले असता त्यांना दोघेही तारेला चिकटल्याचे दिसले. अश्विनी दत्तात्रय नागवडे या काठीने विजेची तार बाजूला काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. संतोष नागवडे यांनी सर्व इलेक्ट्रिक प्रवाह बंद करून दोघांना बाजूला केले. तोपर्यंत दोघेही बेशुद्ध पडले होते.

दोघांनाही ताबडतोब मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये आणले. परंतु, डॉक्टरांनी दत्तात्रय दगडू नागवडे मृत झाल्याचे सांगितले. मुलाला प्राथमिक उपचार करून पुढील अत्यावश्यक उपचारासाठी दौंड येथे पाठवले. येथे उपचारादरम्यान पहाटे मुलगा प्रसाद याचे देखील निधन झाले. या दुर्घटनेमुळे नागवडे कुटुंब व संपूर्ण बाभूळसर गावावर शोककळा पसरली आहे. 

या घटनेचा तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आबासाहेब जगदाळे, सुभाष रुपनवर, कॉन्स्टेबल योगेश गुंड, किरण डुके, अक्षय काळे हे करीत आहेत.