Fri, Sep 25, 2020 15:27होमपेज › Pune › डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ

डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ

Last Updated: Dec 15 2019 1:21AM
पिंपरी : प्रतिनिधी

शहर परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची डबकी बनली आहेत. विकासकामांसाठी खोदलेले रस्ते संबंधित विभागाकडून वेळच्या वेळी बुजविले जात नाहीत. त्यामुळे  या खड्ड्यांमुळे  थंडीतही डासांपासून होणारे आजार आणखी कहर माजवित आहेत.  डेंग्यूमुळे थेरगाव येथील दोन लहान भावंडांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागास कधी जाग येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरामध्ये तुंबलेली गटारे, ड्रेनेज यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.  डासांमुळे मलेरिया, डेंग्यू आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.  डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. विकासकामाच्या नावाखाली खड्डे, रस्ते, पूल बांधण्यासाठी खोदाई केली जाते. बर्‍याचदा या ठिकाणी असणार्‍या जलवाहिन्या फुटून पाण्याचा अपव्यय होतो. तसेच खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. 

शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यात 9 हजार 179  तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या 1 हजार 286 संशयित रुग्णांपैकी डेंग्यूचे 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर चिकुनगुनियाचे 2 संशयित आणि मलेरियाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर महिन्यामध्ये 63 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते तर नोव्हेंबर महिन्यात 52  डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.

हिंजवडी : एकाच घरातील दोन भावांचा महिन्याभरात डेंग्यूने  मृत्यू झाल्याने थेरगावात येथील पडवळनगर परिसरात शोककळा पसरली.  सख्ख्या दोन भावांचा एका महिन्याच्या आत  दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

येथील उजेर हमीद मणियार (वय 4, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचा शुक्रवारी (दि. 13) पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचाच 9 महिन्यांचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा 16 नोव्हेंबर रोजी दुर्दैवी अंत झाला होता.  महिना उलटण्याच्या आत एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकात हळहळ व्यक्त होत आहे. पोटच्या दोन मुलांना एकाच महिन्यात गमावल्याने या चिमुकल्यांचे आई-वडील शोकाकुल आहेत. पिता हमीद मणियार व आई रिजवाना यांना त्यांचे  नातेवाईक सावरत आहेत. आई रिजवानाची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  याच परिसरात गेल्या आठवड्यात आणखी एका तरुणाला डेंग्यूची लागण झाली होती. तर मणियार यांच्या मोठ्या भावाची 3 वर्षाची मुलगीदेखील तापाने फणफणली आहे. पडवळनगर, दगडू पाटीलनगर, वहिनी साहेब कॉलनी यासह हा प्रभाग क्रमांक 23 चा परिसर सुमारे 20 हजार लोकसंख्येचा आहे. येथे प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि मोलमजुरी करणारे नागरिक वास्तव्य करतात. या दुर्दैवी घटनेला महापालिका प्रशासन जबाबदर असून दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी संतप्त नातेवाईकांसह जमावाने यावेळी केली.

परिसरात गेल्या आठ महिन्यापूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले आहेत. मात्र हे काम करताना अनेक ठिकाणी जुने कनेक्शन आहे त्या अवस्थेत सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. स्थानिक पदाधिकारी व  महापालिकेच्या आरोग्य, ड्रेनेज, आणि पाणीपुरवठा विभागाला यासाठी जबाबदार धरले जात आहे.  औषध फवारणी, धुरीकरण, साफसफाई, ड्रेनेज स्वच्छता, कचर्‍याची विल्हेवाट आदी कामे संबंधित विभागाकडून केली जात नसल्याने रोगराई वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 "