Mon, Aug 10, 2020 04:41होमपेज › Pune ›

गोटा खोबर्‍यासह तेलही वधारले
 

गोटा खोबर्‍यासह तेलही वधारले
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:05AMपुणे : शंकर कवडे

अरब देशांमधून शहाळ्यांना मागणी वाढल्याने दक्षिणेतील नारळ उत्पादक शेतकर्‍यांनी गोटा खोबरे उत्पादनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी, खोबरे आणि तेलाच्या दरात वाढ झाली असून, वर्षभर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

गोटा खोबरे; तसेच तेलाचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होतो. यंदा तो एप्रिल अखेरपासून सुरू होईल. मागील वर्षी नारळ उत्पादक राज्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नारळाचे उत्पादन अवघे 40 टक्क्यांवर आले आहे. खोबर्‍यापासून तेल काढण्याचा उद्योग सर्वात जास्त तामिळनाडू राज्यात चालतो. सद्यस्थितीत येथून बाजारात आठवड्याला 1 हजार खोबरेल तेलाच्या डब्याची आवक होत आहे. गेल्या वर्षी खोबरे तेलाच्या 15 किलोच्या डब्ब्यास 1 हजार 400 ते 1 हजार 500 रुपये दर मिळाला. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यादरम्यान कमी भाव निघतात. मात्र, यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन तब्बल 3 हजार रुपयांपयर्र्ंत पोहोचला आहे. 

कर्नाटक राज्यातील टिपटूर येथून दररोज 3 ते 4 गाड्या गोटा खोबरे बाजारात दाखल होत आहे. केरळमधून येणार्‍या गोटा खोबर्‍यामध्ये तेलाचे प्रमाण हे जवळपास 65 ते 70 टक्के तर कर्नाटकातून येणार्‍या खोबर्‍यामध्ये 55 ते 60 टक्के राहते. कर्नाटकातील खोबर्‍यामध्ये तेलाचे प्रमाण कमी तसेच खाण्यास गोडी असल्याने त्याला पुणे शहरासह जिल्ह्यातून मोठी मागणी आहे. तर केरळ येथून येणार्‍या राजापुरी खोबर्‍यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यास कोकणासह जळगाव, नाशिक परिसरातून मोठी मागणी राहते. सद्यस्थितीत मसाल्यांचे उत्पादन सुरू झाल्याने खोबर्‍याला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी त्याच्या प्रतिदहा किलोला 900 ते 1000 रुपये असा मिळणारा दर 1450 ते 1600 रुपयांपर्यंत गेला आहे. 

दरम्यान, खोबरे व तेलाला गेल्या वर्षीइतकीच मागणी कायम आहे. यंदा पीक कमी असल्याने गोटा खोबर्‍यासह तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आगामी वर्षभर हिच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज व्यापार्‍यांकडून वर्तविला जात आहे. शहाळे काढण्याकडे शेतकर्‍यांचा कल शहाळ्यांपासून गोटा खोबरे तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. शहाळे वाळून खाली पडल्यानंतर त्यापासून गोटा खोबरे मिळते व त्यानंतर प्रक्रिया करून खोबरे तेल काढण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अरब देशांमधून शहाळ्यांना मागणी होत असल्याने शहाळ्याचे भाव उंच निघत आहे. शहाळ्यांची चांगल्या दराने विक्री होऊन हाती चांगले पैसे पडत असल्याने गोटा खोबर्‍याची वाट पाहण्यापेक्षा शेतकर्‍यांकडून शहाळ्यांची काढणी करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहे. 

Tags : Pune, demand, coconut, water,  arabian, countries