पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
भांडणाच्या प्रकारात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. आता 'तो' आरोपीच करोना बाधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीच्या संपर्कात आलेल्या पाच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एका पोलिस चौकीच्या हद्दीत भांडणाचा प्रकार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भांडण करणाऱ्या आरोपीला चौकीत आणून बसविले. त्यानंतर आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. आता 'तो' आरोपी करोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस चौकीत त्यावेळी हजर असणाऱ्या पाच पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन केले आहे. तसेच, चौकीत औषध फवारणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहा जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यातच हा नवीन प्रकार समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. महिनाभरापूर्वी एका पोलिस ठाण्यातील महिला आरोपीला करोना झाला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र सुदैवाने सर्व पोलिसांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.