Sat, Jan 23, 2021 06:59होमपेज › Pune › दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

Published On: Jul 12 2019 2:07AM | Last Updated: Jul 12 2019 2:06AM
लोणावळा : वार्ताहर

मंकीहिलजवळ बुधवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची सेवा सुमारे दोन तास विस्कळीत झाली. मंकीहील परिसरात दरड कोसळण्याची मागील 25 दिवसांमधील ही तिसरी घटना आहे. 
मागील दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोर घाटात तसेच मध्य रेल्वेच्या खंडाळा घाट सेक्शनमध्ये सातत्याने दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत होत आहे. बुधवारी दुपारी द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोर घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मंकीहिलजवळ दरड कोसळली. मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर किलोमीटर क्रमांक 116/47 जवळ ही घटना घडली. यामुळे रेल्वेची सेवा दोन तास विस्कळीत झाली होती. दरम्यान, रेल्वे कर्मचार्‍यांनी अथक  प्रयत्न करून पहाटे 6 वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅक व आजूबाजूला पडलेला सर्व राडारोडा बाजूला केला. गेल्या सोमवारी याच ठिकाणी किलोमीटर क्रमांक 115 जवळ असलेल्या बोगद्यासमोर दरड कोसळली होती. तर 13 जून रोजी किलोमीटर क्रमांक 117/500 येथील बोगद्याजवळ दरड कोसळली होती. तर पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर बुधवारी ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याच ठिकाणी चार दिवस आधी रविवारी दरड कोसळली होती.

सातत्याने दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पुणे - मुंबई प्रवास असुरक्षित बनला आहे. दरडीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे विभागाकडून कर्जत ते खंडाळा या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांमुळे या ठिकाणी लक्ष ठेवता येणे शक्य झाले असले तरी अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी रेल्वेकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. 

द्रुतगती महामार्गावर संपूर्ण घाटात संरक्षक जाळ्या बसवूनही दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी द्रुतगती महामार्गावरील प्रवास देखील असुरक्षित झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे तसेच रस्ते विकास महामंडळाने खंडाळा घाटामध्ये दरडींबाबत ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

पानशेत-मुठा खोर्‍यात संततधार

वेल्हे ः पानशेत, मुठा, वरसगाव खोर्‍यात लागोपाठ दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार कायम आहे. खडकवासला धरण साखळीत गुरुवारी (दि. 11) सायंकाळपर्यंत 42 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला होता. खडकवासला धरण बुधवारपासून 100 टक्के भरून वाहत आहे. पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी खडकवासलातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली.