होमपेज › Pune › मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये : शरद पवार 

मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये : शरद पवार 

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी

आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधार्‍यांना पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. मात्र, मित्रपक्षानेही आमची ताकद पाहून, सन्मानपूर्वक वाटाघाटी कराव्यात. ज्या जागा आम्ही जिंकल्या आहेत, त्या आम्हाला मिळाव्यात. मागील निवडणुकीत मित्रपक्षाने इतरांना मदत करून आमचे उमेदवार पाडले. यावेळी मित्रपक्षाने रडीचा डाव न खेळता समन्वयाची व सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळत खडसावले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीत बोलताना पवार म्हणाले की, राज्यात पालघर, भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात, सांगलीतील पलूस विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. सत्ताधार्‍यांना रोखण्यासाठी या निवडणुका मित्रपक्षांना सोबत घेऊन लढण्याची आमची भूमिका आहे. 

धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये, हा आमचा उद्देश आहे. परंतु, आम्ही समन्वयाची भूमिका घेत असताना मित्रपक्षाने तशीच रास्त भूमिका घ्यावी, ही अपेक्षा आहे. सातारा, सोलापूर, भंडारा-गोंदिया या जागा आमच्याकडे असतानाही मित्रपक्षाने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्याचा फायदा विरोधकांना झाला. त्यामुळे पूर्वी ज्या जागांवर जो पक्ष जिंकला आहे, ती जागा त्याच पक्षाने लढवावी, अशी आमची भूमिका आहे.

पंतप्रधान जिथे बोलायचे तिथे बोलत नाहीत

पवार पुढे म्हणाले की, देशातील महिला, दलित, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याकांबद्दल सरकारची बांधिलकी नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जनता सरकारवर नाराज आहे, ती अस्वस्थ आहे हे त्यांनी सत्ताधार्‍यांना दाखवून दिले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न बोलणारा पंतप्रधान म्हटले जात होते. विद्यमान पंतप्रधान मोदी खूप बोलतात. मात्र, दलितांवरील अत्याचार, नुकतेच घडलेले अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनांवर ते बोलत नाहीत. जेथे बोलायचे तेथे बोलत नाहीत, असा चिमटा शरद पवार यांनी यावेळी काढला.