Tue, May 26, 2020 13:55होमपेज › Pune › उत्पादकांसमोर अतिरिक्त दुधाचे आव्हान

उत्पादकांसमोर अतिरिक्त दुधाचे आव्हान

Last Updated: Mar 29 2020 12:58AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध पावडर आणि बटरची  मागणी घटली आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सुमारे 40 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत असल्याने हे दूध साठवायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध संघांनी आठवड्यात परिस्थितीनुसार एक किंवा दोन दिवस संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुधाचे भाव आणखी घटण्याची शक्यता  व्यक्त करण्यात येत असून शेतकरी अडचणीत आला आहे.                     

याबाबत दुग्ध वर्तुळातून प्राप्त माहितीनुसार, राज्यात पाऊच पॅकिंगमधील दुधाची सुमारे एक कोटी लिटर इतकी दररोज विक्री होते. त्यापैकी 40 टक्के म्हणजे सुमारे 40 लाख  लिटर दूध सध्या अतिरिक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या धास्तीने अनेक ग्राहक गावाकडे परतले आहेत. अनेक किरकोळ दूध विक्री करणारी दुकाने बंद आहेत. दुधाच्या उपपदार्थांना मागणी नसल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे सर्व डेअरी उद्योगाने दूध विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाची समस्या उद्भवण्यापूर्वी दूध पावडरचा प्रतिकिलोचा भाव 290 ते 300 रुपये होता. जो आज 210 ते 220 रुपयांपर्यंत खाली आला आहे. लोण्याचा भाव (बटरचा)  300 ते 310 रुपये होते; परंतु आज मागणीच नसल्यामुळे भाव काय सांगायचा या विवंचनेत सध्या डेअरी उद्योजक आहेत. दूध पावडरला जागतिक बाजारपेठ तसेच देशांतर्गत मागणी सुरू होण्याची सध्या सुतराम शक्यता नाही. त्यामुळे दुधाचे भाव घटण्यास सुरुवात झाली आहे.  

तालुकानिहाय संकलन बंद राहणार 

‘कात्रज’चे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले की, अतिरिक्त दुधाच्या समस्येमुळे दूध संघाने तालुकानिहाय एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी 29 मार्चपासून सुरू आहे. कोरोनाच्या समस्येपूर्वी रोजचे दूध संकलन एक लाख 80 हजार लिटर इतके होते. सद्य:स्थितीत  कात्रजकडील दूध संकलन  2 लाख 15  हजार लिटरवर पोहोचले आहे. म्हणजेच सुमारे 30 ते 35 हजार लिटर दूध संकलन वाढले आहे. प्रत्यक्षात दूध विक्री 70 हजार लिटरवर पोहोचलेली आहे.  दुधापासून उपपदार्थनिर्मिती ठप्प झालेली असल्याने  एक दिवस संकलन बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.