Wed, Jan 20, 2021 08:33होमपेज › Pune › पुणे आरटीओकडून मालवाहतूक वाहनांना प्रमाणपत्र

पुणे आरटीओकडून मालवाहतूक वाहनांना प्रमाणपत्र

Last Updated: Mar 26 2020 8:53PM
पुणे :  पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत पार पाडण्याकरिता मंत्रिमंडळाकडून नुकतीच मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे आरटीओकडून शहरांतर्गत आणि शहराबाहेर मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनचालकांना पुणे शहरात मालवाहतुकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणींचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी व अत्यावश्यक सेवा व वस्तुंची वाहतूक करणार्‍या वाहनधारकांच्या सोयीकरिता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई मेलवर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी कार्यालयाच्या या rto.12-mh@gov.in  ईमेलवर अर्ज करावा, असेही आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, या कामाकरिता कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरातील मालवाहतूक संघटनांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवा वस्तूच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.