Tue, Jul 14, 2020 10:57



होमपेज › Pune › हरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ (video)

हरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ (video)

Last Updated: Jun 30 2020 3:07PM




वीस लोकांचा बसमध्ये समावेश 
टाळ-मृदुंगाचा गजर, पुष्पवृष्टीत लालपरी रवाना 

आळंदी : श्रीकांत बोरावके

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥

पंढरपूरच्या सावळ्या विठू रायच्या ओढीने परंपरेने पंढरपूरला जाण्याऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका यंदा लालपरी (एसटी) ने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. यंदा कोरोनामुळे पालखी व रथा ऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थित लालपरीने पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. 

सतरा दिवसांचा आजोळ घरातील मुक्काम हलवून मंगळवारी (दि.३०) रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पादुका सुपूर्द केल्या. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त, सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या पादुका हरिनामाचा गजरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांनी एस. टी. बस पर्यंत चालत जात पादुका मोजक्या वीस लोकांच्यासमवेत हरिनाम, टाळ-मृदुंगाच्या गजरात विठाई बसचे स्वरूप असलेल्या एसटी बसमध्ये विराजमान केल्या. एसटी बसवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. 

माऊली - माऊलींच्या गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक लावंड, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, सोहळा प्रमुख योगेश देसाई, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब चोपदार, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, अशोक कांबळे, राहुल चिताळकर व मानकरी, वारकरी, भाविक उपस्थित होते.

मंगळवारी पहाटे माऊलींच्या पादुकांवर पवमान पूजा व दुधारती झाल्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा वाजता महानैवेद्य दाखविण्यात आला त्यानंतर पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ करण्याच्या विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पादुका सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास पंढरपूरला पोहोचणार आहेत. 

देवस्थानला पादुकांसोबत वीस जण नेण्याची परवानगी देण्यात आली होती. यात उर्जितसिंह शितोळे सरकार, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, पुजारी, चोपदार, चवरीवाले, अब्दागिरीसह काही मानकरी, दिंडी प्रमुख, विणेकरी समाविष्ट होते.