Sun, Feb 28, 2021 06:47
पुणे : बोरीबेलच्या बाधित क्षेत्रात ‘बर्ड फ्लू’च्या संसर्गाने प्रशासन सतर्क, नागरिकांचीही तपासणी

Last Updated: Jan 16 2021 7:30PM
देऊळगाव राजे : पुढारी वृत्तसेवा

बोरीबेल (ता. दौंड) येथील घरगुती पाळीव कोंबड्यांचा भोपाळ येथील प्रयोगशाळेतील ‘बर्ड फ्लू’ संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तालुका तसेच जिल्हा पातळीवर पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. (administration alert on bird flu affected area in boribel pune) बाधित क्षेत्रात आरोग्य विभागाच्या व पशुसंवर्धन विभागाच्या टीम पोहोचल्या आहेत. बाधित पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया, तसेच त्यांचे खाद्य, अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.  

देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मृत पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणीही करण्यात आली आहे. परिसरातील शेतकरी व गावकरी यांना बाधित पक्ष्यांच्या संपर्कात न येण्याचे तसेच काही लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Deulgaon Raje Primary Health Center) वतीने करण्यात आले आहे.

वाचा : मुळशी तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडल्याने मारल्या पाच हजार कोंबड्या

आजपर्यंत पक्ष्यांच्या संपर्कातील कुठल्याही व्यक्तीला बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आलेली नाहीत. संसर्ग क्षेत्रापासून १ किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर १० किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दिली. या आदेशाप्रमाणे परिसरातील चिकन खरेदी-विक्रीस बंदी करण्यात येणार आहे. मटण व्यावसायिकांना व पोल्ट्रीचालकांना तशा सूचनाही जारी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १० किलोमीटर परिघात पुढील २१ दिवसांसाठी पक्षीवर्गीय प्राण्यांच्या हलचालीस प्रतिबंध करण्यात येणार असल्याचे देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुमित सांगळे यांनी सांगितले आहे.

वाचा : 'मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार'

बोरीबेल येथील बाधित क्षेत्रापासून १० किमी परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर व शीतलकुमार मुकणे परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असून दौंडचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित क्षेत्रापासून १ किमीच्या परिघातील अंडी, कुक्कुट पक्षी व पक्ष्यांचे खाद्य नष्ट करण्यात येणार आहे.

वाचा : बारामती : झुआरी खत कंपनीचा इमेल हॅक करून ५ कोटींची फसवणूक 

बाधितांना नुकसानभरपाई मिळणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गावरान पक्ष्यांसाठी आठ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या पक्षाला २० रुपये, तर आठ आठवड्यांपेक्षा जास्त वयाच्या पक्ष्याला ९० रुपये, बॉयलर पक्ष्यांसाठी ६ आठवड्यापेक्षा लहान पक्ष्यांना २० रुपये व सहा आठवड्यापेक्षा जास्त वयाच्या पक्ष्यांना ७० रुपये प्रतिपक्ष्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नष्ट करण्यात येणाऱ्या अंड्यांना प्रतिनग ३ रुपये व खाद्यास प्रतिकिलो १२ रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारी नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. मटण विक्रीतही बर्ड फ्लूच्या भीतीने उठाव कमी झाला आहे. विक्रीसाठी आणलेले पक्षी जास्त दिवस ठेवले तर वजनात घट येऊन मटण व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे.
- दस्तगीर इनामदार, पोल्ट्री व मटण व्यावसायिक