Wed, Aug 12, 2020 09:14होमपेज › Pune › पगार रखडल्याने ‘एचए’ कामगारांना झळा

पगार रखडल्याने ‘एचए’ कामगारांना झळा

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:52AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांचा पगार तब्बल 13 महिन्यांपासून रखडला आहे. कंपनीचे उत्पादन सुरू असले तरी कामगारांना पगारापासून वंचितच रहावे लागत आहे. 25 टक्के पगार घेण्याबाबत व्यवस्थापनाकडून प्रस्ताव ठेवला जात आहे; मात्र कामगारांच्या हातामध्ये तुटपुंजा पगार मिळणार असल्याने ते याला विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे 13 महिने कामगारांना पगार रखडण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

एचए कंपनीचे चार ते पाच युनिट सुरू करण्यात आले आहेत; मात्र तरीही कामगारांना पगारापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे कंपनी नेमकी फायद्यात आहे की तोट्यात असा सवाल कामगार करत आहेत. एप्रिल 2017 पासून कामगारांना पगार मिळालेला नाही. कोट्यवधी  रुपयांचे  उत्पादन सुरू आहे; मात्र कंपनीवरील देणी असल्यामुळे कामगारांच्या पगाराला कात्री लागत आहे. 

मध्यंतरी दिवाळीला कामगारांना त्यांच्याच पीएफ मधील काही रक्‍कम देण्यात आली. त्यामधून कामगारांनी सण साजरा केला. सध्या कामगारांना 25 टक्के रक्‍कम घेण्याचा प्रस्ताव कंपनी व्यवस्थापन ठेवत आहे. हा प्रस्ताव स्वीकारला तर याचा अधिकार्‍यांना फायदा होणार आहे. कामगारांच्या पगाराची रक्‍कम पाहता त्यांच्या हातामध्ये तुटपुंजा पगार मिळणार आहे. त्यामुळे कामगारांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. संपूर्ण पगार देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. 

पुन्हा वेतन रखडू लागल्यामुळे कामगारांमधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. ‘एचए’ कंपनीच्या भूखंडाची विक्री करून कामगारांची थकित देणी व कंपनीवरील कर्जाची फेड करण्याचा विचार शासन करत होते. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. दोन वेळा निविदा काढूनही कोणीच प्रतिसाद दिला नाही.  भूखंड विक्रीची प्रक्रिया खुली ठेवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्याचे समजते; मात्र त्याचे पुढे काय झाले असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत. तर कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशी संपर्क न झाल्याने त्या बाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही.

लोकप्रतिनिधींची अनास्था

एचए कंपनीबाबत शहरातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. पुर्वी वारंवार या बाबत संसदेत व विधानमंडळामध्ये आवाज उठविला जात होता. सध्या 13 महिन्यांपेक्षा अधिक काळ कामगारांचा पगार रखडला आहे. तरी अद्याप एकाही लोकप्रतिनिधींनी कामगारांची चौकशी केली नाही. कंपनी सुरू होण्याबाबत कोणताच पाठपुरावा केला नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.

 

Tags : pimpri, pimpri news, Hindustan Antibiotics Company, Worker, salary,