स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क
मुलीने लग्नाआधी कौमार्य चाचणी दिलीचं पाहिजे, नाही तर समाज बहिष्कार टाकेल, वाळीत टाकेल म्हणून वर्षानुवर्षे कुप्रथा जपत जगणारे अनेक जण आहेत. परंतु, या प्रथेला विरोध करणारे तरुण सध्या पुढे सरसावले आहेत. असंख्य तरुणांपैकी एक आहेत, सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचिकर. कंजारभाट समाजातील तरुणांनाही आपल्या समाजात कौमार्य चाचणी किती घृणास्पद प्रकार आहे, हे लक्षात आलं आहे. म्हणूनचं कौमार्य चाचणी यासारख्या कुप्रथेविरोधात 'Stop The V Ritual' अभियान चालवले जात आहे.
ताजचं उदाहरण द्यायचं झालं तर आज (दि. ८) पुण्यामध्ये एका ठिकाणी असाच लग्न सोहळा पार पडत आहे. धनंजय तमायचिकर आणि प्रियंका इंद्रेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. मुलीच्या कौमार्य चाचणीविना हे लग्न पार पडत आहे. आता माणसांची याबद्दलची मानसिकता बदलत चाचलली आहे. मुलींची कौमार्य चाचणी करणार नाही, असे म्हणत अनेक जोडीदार लग्नाच्या बंधनात अडकलेत आणि तशी तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
कंजारभाट समाजातील प्रथांना विरोध करून जोडपं लग्नमंडपात लग्नासाठी उभं राहणार आहे का?, समाज आपल्याला वाळीत टाकेल, आपल्यावर बहिष्कार टाकेल, याची त्यांना भीती नसेल का? किंवा लग्नानंतर आपल्याला याचे काय परिणाम भोगावे लागतील? याचा विचार केला नसेल का? यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या कुप्रथेविरोधात उतरलेल्या तरुणांकडे आहे.
कंजारभाट समाज
कंजारभाट समाज मूळत: राजस्थानातील. या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा समाज विखुरलेला. हा समाज महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी वास्तव्यास दिसून येतो.
कौमार्य चाचणी म्हणजे काय?
आपल्याकडे कौमार्यबद्दल बोलणे म्हणजे लज्जास्पद. पण इथे मुलीला लग्नाआधीच कौमार्य चाचणी द्यावी लागते, कंजारभाट समाजातील जात पंचायत जे सांगतील, ते निमूटपणे सहन करायचं. लाच्छनास्पद प्रकाराला सामोरं तर जायचंच, शिवाय जात पंचायतीतील ढिगभर माणसांच्या नजरा तिच्याकडे असतात. ती कौमार्य चाचणीत पास झाली की नापास हे उघडपणे त्यांना दाखवणं, हा एक लाजिरवाणा प्रकार होय. कौमार्य चाचणीवेळी पांढऱ्या रंगाच्या चादरीवर जर डाग पडला तर ती स्त्री व्यभिचारी नाही, ती पवित्र असते, असं मानलं जातं. हा प्रकार इथंचं थांबत नाही तर यासाठी मुलाला अर्धा तासांचा वेळ देऊन हा प्रकार करण्यास सांगितला जातो, शिवाय ती चादर दाराबाहेर उभारलेल्या मंडळींना पुरावा म्हणून आणून दाखवण्यासारखा प्रसंग घडतो.
स्त्रीचं कौमार्य नेहमीचं अबाधित राहतं का?
स्त्रीचं कौमार्य नेहमीचं अबाधित राहत नाही. कारण, ते इतर अनेक कारणांनीही जाऊ शकतं. जसं की, खेळणे, सायकलिंग वगैरे किंवा अनेकदा काही स्त्रियांना जन्मजातच 'तो' पडदा नसतो. पण, डोळ्यांवर पडदा झाकलेले हे लोक मान्य करत नाहीत.
कौमार्य चाचणीला इतकं महत्त्व का दिलं जातं?
महाराष्ट्रात जातपंचायतीसमोर आपण पवित्र आहोत की नाही, कौमार्य चाचणी म्हणजे आपल्या घराची इभ्रत, अब्रू अशी संकुचित विचारांनी जोखडलेली ही प्रथा होय.
एका समाजात किती बंधनं, नियम आणि प्रथा असू शकतात. या प्रथा कितपत सहन करायच्या? कुणी ना कुणी या विरोधात आवाज उठवेल, असे म्हणत असतानाचं कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथेविरोधात अनेक तरुणांबरोबर संघर्ष करायला विवेक तमायचीकर उतरले.
फोटो- विवेक तमायचिकर यांनी कंजारभाट समाजाच्या प्रथांविरोधात लग्न केलं आहे
काय आहे Stop v अभियान?
कौमार्य चाचणीशिवाय मुलीला शिवाय, जोडप्यांनाही स्वच्छंद, स्वातंत्र्यपणे, ताठमानेने जगण्याचं बळ या मोहिमेने मिळालं आहे. विवेक तमायचीकर यांच्यासारख्या तरुणांनी 'Stop The V Ritual' अभियान सुरू केलं आहे. परंतु, हे अभियान यशस्वी होऊ नये म्हणून समाजातील काही विकृतांनी 'Stop The V Ritual' विरोधात स्त्रियांना पुढे केलं आणि या तरुणांवर विनयभंग, मानहानीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. तरीही या तरूणांनी हार मानली नाही. आपलं काम त्यांनी सातत्याने सुरू ठेवलं आहे. कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची प्रथा संपुष्टात आणून या चाचणीविना तरुण-तरुणी एकमेकांचे साथीदार बनतील आणि ही अमानुष प्रथेला कायमचा आळा बसेल, असा अभियानामागील उद्देश होय.
ही प्रथा मूळापासून उपटून टाकायची म्हणजे समाजातील लोकांमध्ये जागृती करणं खूपचं गरजेचं. वर्षानुवर्षे या प्रथेच्या जाळ्यात अडकलेल्यांची मानसिकता बदलण्याची खूप आवश्यकता आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी समाजात विवेक तमायचिकर यांच्यासारखे तरुण अविरतपणे कार्यरत आहेत. आपण जेव्हा बदलू तेव्हा समाजातील कुप्रथा, रुढी संपुष्टात नक्कीच येतील!...