Fri, Apr 23, 2021 14:19
पूजा चव्हाण प्रकरणावर केंद्रीय तपास यंत्रणेचा वॉच?

Last Updated: Feb 27 2021 2:41AM

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी जशी नजर ठेवली होती, तशीच परिस्थिती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात निर्माण झाल्याने राज्याच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. थेट सेनेच्या कॅबिनेट मंत्र्यावर आरोप होत असल्याने विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत विरोधी पक्षाने थेट केंद्राकडून तपास यंत्रणा कामाला लावल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

या प्रकरणात तब्बल चार आठवड्यांनंतरही पुणे पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा ठोस तपास केला नसल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी पुणे येथील वानवडी पोलिस ठाण्यात धडक दिली. या वेळी तपासाबाबत माहिती जाणून घेण्याचा वाघ यांनी प्रयत्न केला असता, केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील गदारोळ पाहून केंद्रीय तपास यंत्रणेने याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत  समांतर यंत्रणा वापरून त्यावर बारीक नजर ठेवली जात आहे. प्रकरणाचे धागेदोरे परळी तालुक्यातील वसंतनगर तांड्यापासून पुणे, यवतमाळपर्यंत पोहोचत असल्याने थेट केंद्रीय तपास यंत्रणांनी नजर ठेवल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.

का होतोय पुणे पोलिसांचा गोंधळ?

या प्रकरणात विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा असे तपासाचे कंगोरे आहेत. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा गर्भपात एकच दिवस अगोदर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात झाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी पुण्यात पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या वेळी अरुण राठोड नावाचा तरुण तेथे उपस्थित होता. एवढेच नाही तर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्री (भाऊ) व अरुणचे संभाषण आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी विदर्भ व मराठवाड्यातील तपासातील सूक्ष्म धागेदोरे ओळखणे अवघड जात आहे. शिवाय हे प्रकरण संपूर्ण राजकीय असल्याने तपासात पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे शहर पोलिस दलातील उच्चस्तरीय पोलिस अधिकार्‍यांपासून ते पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवली आहे.

या घटनांवर केंद्रीय तपास यंत्रणांची नजर

  पूजा चव्हाण हिचे जन्मस्थान ते यवतमाळपर्यंतचा प्रवास व पुण्यातील वानवडी येथील तिचे वास्तव्याचे ठिकाण या संपूर्ण ठिकाणांचा बारकाईने नव्याने अभ्यास केला जाणार आहे.

  यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात झाला, त्या वेळी कर्तव्यावर असलेले विभागप्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण अचानक रजेवर का गेले? 

  यवतमाळ येथे तपासासाठी दहा दिवस मुक्काम ठोकलेल्या पुणे पोलिसांनी डॉ. चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे का आणि जर नसेल तर तो का नोंदवला नाही?

  गर्भपात करण्यात आलेली तरुणी रेकॉर्डवर मराठवाड्यातील नांदेडची दाखविण्यात आली आहे. मग ती यवतमाळमध्ये कशी आली, याचादेखील तपास करण्यात येणार आहे.

  पूजा चव्हाणने आत्महत्या केली, त्या वेळी दोघे उपस्थित असणारे तरुण आणि कथित मंत्री यांचा काय संदर्भ आहे?

  ऑडिओ क्लिपमध्ये परळी, यवतमाळ, पुणे व थेट मंत्रालय यांचा संदर्भ आला आहे. तोदेखील पडताळला जाणार आहे. 

  कथित मंत्र्यासोबतचे आलिशान हॉटेलमध्ये काढलेले फोटो खरे आहेत की खोटे?