Wed, Apr 01, 2020 23:33होमपेज › Pune › पुणे : धानोरीमध्ये किरकोळ वादातून युवकाची हत्‍या 

पुणे : धानोरीमध्ये किरकोळ वादातून युवकाची हत्‍या 

Last Updated: Jan 22 2020 10:47AM
विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा 

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने केलेल्या गंभीर मारहाणीत युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात घडली. सागर महादेव भालेराव (वय 24, रा. मुंजाबावस्ती, धानोरी) याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला असून, चार संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील काही आरोपी अल्पवयीन असून विश्रांतवाडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा : साई जन्मस्थळ वाद; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाथरीकर मुंबईत दाखल

काल (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकात सागर याची किरकोळ वादातून भांडणे झाली. याच भांडणातून दुसर्‍या गटातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने सागरला लाकडी पटट्यांसह लाथाबुक्यांनी मारहाण करून येथून पळ काढला होता. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सागर घरी आला होता. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

अधिक वाचा : बदलापूर पूर्व एमआयडीसीतील कंपनीत बॉयलरचा स्‍फोट, ३ कामगार जखमी (video)

घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रविंद्र कदम यांनी धाव घेतली. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.