Sat, Apr 10, 2021 20:36
लसीकरण एक आठवडा लांबणीवर

Last Updated: Feb 27 2021 2:41AM

पुणे ः पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्र्यांनी एक मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार असल्याचे मोठा गाजावाजा करत जाहीर केले होते. मात्र, एक मार्चपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार नाही. त्याआधी लसीकरणाची प्रक्रिया म्हणजे अधिकार्‍यांचे प्रशिक्षण, नवीन कोविन अ‍ॅपची ट्रायल सुरू होणार आहे. एक आठवड्यानंतर नोंदणी व त्यानंतर लसीकरण सुरू होणार आहे.

केंद्र सरकारने लसीकरणाची घोषणा केल्यावर ती नेमकी कशी दिली जाणार, त्यासाठी काय नियोजन करावे लागणार याची मार्गदर्शक तत्त्वे केंद्राकडून सर्व राज्यांना शुक्रवारी (दि. 26) स्पष्ट करण्यात आली. तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणात वय वर्षे 45 ते 60 दरम्यान असलेल्या ज्या व्यक्तींना विविध आजार आहेत (कोमॉर्बिड) त्यांचे आणि 60 वर्षापुढील वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे  लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी  कोविन अ‍ॅप विकसित केले आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांत ही लसीकरण केंद्र उभारली जाणार असून त्यामधील सरकारी रुग्णालयांत मोफत तर खासगी रुग्णालयांत शुल्क देऊन लस घ्यावी लागणार आहे. हे शुल्क किती असणार ते दोन ते तीन दिवसानंतर ठरणार असल्याची माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी व आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

व्याधिग्रस्त नागरिक आणि ज्येष्ठांना लसीकरण करून घेण्यासाठी नवीन कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी करता येईल. ज्यांना हा पर्याय शक्य नाही त्यांना लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येईल.

वृद्धांना लसीसाठी फक्त ‘आधार’ची अट

लसीकरणासाठी साठ वर्षांवरील नागरिकांना आधार कार्डाव्यतिरिक्त कुठल्याही अन्य कागदपत्रांची गरज भासणार नाही, तर 45 वर्षांवरील लोकांना आपल्या आजाराचे (मधुमेह, रक्तदाब आदी) प्रमाणपत्र दाखवावे लागेल. ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, त्यांना केंद्रांवर नोंदणीचा पर्याय उपलब्ध असेल.

कोरोना लस टॅबलेट स्वरूपात

पुणे : पुढारी वृत्तसेवा

लस किंवा लसीकरण म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते इंजेक्शन, लसीची व्हायल्स, सीरिंज आणि लस देणारी यंत्रणा. पण या पारंपरिक लसीकरणाला आणि समजाला छेद देण्याचे काम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ करत आहेत. आताच्या लसीसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि लसनिर्मितीची मर्यादा पाहता हे शास्त्रज्ञ आता लस ही गोळी (टॅबलेट) आणि स्प्रेच्या स्वरूपात निर्माण करता येईल का, याबाबत संशोधन करत आहेत. असे झाल्यास लसीकरणाचा वेग प्रचंड वाढेल.

भारतासारख्या देशात अजूनही लसीकरण म्हणावे तसे वेग घेत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे लसीची कमी प्रमाणातील उपलब्धता व साधनसामग्रीचा अभाव. सध्याची लस ही इंजेक्शन स्वरूपात असल्याने कमी वेळेत जास्त उत्पादन करता येत नाही. या सर्व प्रश्नांचा विचार करून आणि कमी वेळेत संपूर्ण जगभरात लस उपलब्ध व्हावी म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ लस गोळीच्या आणि स्प्रेच्या स्वरूपात निर्माण करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्याच्या चाचण्याही सुरू आहेत, अशी माहिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली.

जगातील पहिलाच प्रयोग

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ, प्रा. सारा गिलबर्ट यांनी इंग्लंडमधील कॉमन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीसमोर 24 फेब—ुवारी रोजी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारे लसीची गोळी तयार करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असेल आणि त्यामुळेच यासाठी काही वेळसुद्धा लागू शकतो, असे गिलबर्ट यांनी सांगितले.