Thu, Jul 09, 2020 23:59होमपेज › Pune › अनधिकृत फ्लेक्सबाजीला उधाण

अनधिकृत फ्लेक्सबाजीला उधाण

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:00AMवारजे : प्रदीप बलाढे

वारजे उपनगरातील वारजे, कर्वेनगर मुख्य चौक, तसेच आंबेडकर चौक, वारजे हायवे चौक, माळवाडी बसस्टॉप, गणपती माथा, तसेच  शिवणे या मुख्य चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्सला उधाण आले असून या अनधिकृत बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसर विद्रुप झाल्याचे दिसून येत आहे. परिसर विद्रुपीकरणासह पालिकेची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणार्‍यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न नागरिक करत आहेत. महापालिका हद्दीत फ्लेक्स लावण्यासाठी आकाश चिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही कुठलीही परवानगी न घेता अनेकदा असे जाहिरात फ्लेक्स लावले जात आहेत. 

राजकीय नेते, युवा नेत्यांचे शुभेच्छा पोस्टर त्यांचे कार्यकर्ते चक्क वारजे जकात नाका येथील मुख्य दिशादर्शक फलकावरच लावून विचित्र असे चित्र प्रदर्शन करत आहेत. दिशादर्शक फलकावरील बॅनर तसेच वारजे मुख्य रस्त्यावरील केलेल्या बॅनरबाजीमुळे विद्रुपीकरणासह वाहन चालकांची दिशाभूल होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच दिशादर्शक फलकावरील फ्लेक्समुळे वारजे, कर्वेनगर भागात नव्याने येणारे नागरीक तसेच शहराच्या दिशेने जाणारे आणि येणारे  नवीन वाहनचालकांची दिशाभूल होत असून  दिशा दर्शवणार्‍या फलकावर  एक राजकीय जाहिरात फलक दिसू लागला आहे. 

या दिशादर्शक फलकावर व्यावसायिक तसेच युवा नेत्यांचे शुभेच्छा फलक लावल्याचेही अनेकदा दिसून येत आहे. तर आंबेडकर चौक परिसर आणि हायवे चौक या ठिकाणीही अगदी चौकातच मोठमोठे कार्यक्रम फलक, वाढदिवसाचे तसेच व्यवसाय वृद्धीचे फलक नेहमीच मोठ्या थाटाने सजलेले असतात. एक फ्लेक्स निघत नाही तर दुसरा फ्लेक्स बांधण्यात येतो आहे. त्यातच चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि फ्लेक्सचा वाढता बकालपणा तसेच वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांमुळे परिसरात विद्रुपीकरणासह वाहनांना धोका निर्माण होत आहे. 

परिसराच्या विद्रुपीकरणासह महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. एकूणच स्मार्ट सिटीकडे शहराची  वाटचाल सुरू असताना या जाहिरात, शुभेच्छा फलकांमुळे परिसरातील सौंदर्यास बाधा निर्माण होत असून फ्लेक्सचा वाढता बकालपणा हा कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न नागरिक विचारीत आहेत. 

महापालिकेच्या वतीने या अनधिकृत जाहिरातदारांवर, तसेच परिसर विद्रुप करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उत्सव काळात स्पर्धा

सण-उत्सव तोंडावर असून या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर  वारजे माळवाडी परिसरात, तसेच एन.डी.ए. मुख्य रस्त्यावर मोठमोठे लाकडी पहाड काही ठिकाणी उभे राहत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. आता दहीहंडी व गणेश उत्सव यामुळे परिसरात जणू फ्लेक्सबाजीची स्पर्धा सुरू आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे.