टेम्पोला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

Last Updated: Jul 13 2020 2:00PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


पुणे : पुढारी वृत्तसेवा 

चुकीच्या पद्धतीने टेम्पो उभा केल्यामुळे दुचाकीस्वाराने मागून जाऊन धडक दिल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना डुक्करखिंड येथे घडली. मोहम्मद शकील अब्दुल सत्तार (२७, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारत बेंझ कंपनीच्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा प्रकार समजताच चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत पोलिस शिपाई राजू युसुफ शेख यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा : वरवरा राव यांना अत्यावश्यक सोयीयुक्त रुग्णालयात भरती करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई, बंगळूर महामार्गावर चांदणी चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर डुकरखिंड रोडवर एक भारत बेंज कंपनीचा पांढरा टेम्पो वाहतुकीला अडथळा अशा पद्धतीने थांबला होता. त्यावेळी खासगी कंपनीतून आपल्या घरी आपल्या दुचाकीवरून जाणारे मोहम्मद सत्तार हे अचानक थांबलेल्या टेम्पोला जाऊन धडकले. मागून जोरदार धडक बसल्याने सत्तार हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर जखमी झाल्याने रविवारी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

अपघात होताच टेम्पो चालक टेम्पो तेथेच सोडून पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यावर अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रामदास शेवते करत आहे.

वाचा :पुणे : तरुणावर गोळ्या झाडून खून