Fri, Nov 27, 2020 22:03होमपेज › Pune › स्वाइन फ्लूने पुन्हा दोघांचा मृत्यू

स्वाइन फ्लूने पुन्हा दोघांचा मृत्यू

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. वाल्हेकरवाडी येथील 32 वर्षीय युवकाचा, तर अजमेरा कॉलनी येथील 52 वर्षाच्या व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला आहे. मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या 11 वर पोचली आहे. आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 69 झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वैद्यकीय विभागानेही याचा धसका घेतल्याचे चित्र आहे. 

स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची व मृत्यू होणार्‍या रुग्णांच्या संख्येमुळे त्याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकतीच वायसीएममध्ये बैठक घेतली. या आजाराला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या; मात्र अद्यापही त्याला यश येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि. 3) या आजाराने दोघांचा बळी घेतला आहे. वाल्हेकरवाडी येथील 32 वर्षीय युवकाला सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास झाल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 31 ऑगस्ट रोजी संबंधित रुग्णाच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. 

याबरोबरच अजमेरा कॉलनी येथील 52 वर्षीय रुग्णाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्यामुळे 24 ऑगस्ट रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 ऑगस्ट रोजी संबंधित रुग्णाच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. या वेळी त्या रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. उपचारादरम्यान संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.

सोमवारी (दि. 3) तब्बल चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 69 झाली आहे. दोघेजण व्हेंटिलेटरवर आहेत. संशयित रुग्णांना टॅमिफ्लू गोळ्यांचे वाटप केले जाते. या दिवशी 84 रुग्णांना टॅमिफ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शहरात अद्यापपर्यंत एकूण 4 हजार 182 रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सोमवारी नऊ जणांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यानुसार एकूण 193 जणांच्या घशातील द्रव अद्यापपर्यंत  तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. 

5 हजार 855 रुग्णांना टॅमिफ्लू...

स्वाइन फ्लूचे सोमवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 झाली असून त्यापैकी 27 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर 32 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. गेल्या महिन्यात शहरात उपचार घेताना तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन पुण्यातील, तर एक उस्मानाबाद येथील आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत सोमवारी एकूण 79 रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी संशयित 14 रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले. तर सहाजणांचे घशातील स्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्याद्वारे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर शहरात आतापर्यंत 5 लाख 92 हजार रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून पाच हजार 855 रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले आहे.