होमपेज › Pune › दोन नव्या शिलेदारांवर पक्षातील घसरणीचे आव्हान 

दोन नव्या शिलेदारांवर पक्षातील घसरणीचे आव्हान 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : पांडुरंग सांडभोर

पक्ष नेतृत्वाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या पुण्यात शिवसेनेने पुन्हा दोन शहरप्रमुख नेमण्याचा प्रयोग केला आहे. माजी आमदार महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे या जोडीकडे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात पक्षाचा घसरता आलेख उंचावण्याचे ’शिवधनुष्य’ त्यांना पेलावे लागणार आहे. पक्ष बांधणीसोबतच ’सैनिकां’ना ताकद देऊन पुणेेकरांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे आव्हान हे दोन शिलेदार कसे पेलवतात याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता आहे.

शिवसेनेची स्थापना करणार्‍या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मच पुण्यात झाला, मात्र, दुर्दवाने याच पुणे शहरातच शिवसेना वाढू शकली नाही, त्यासाठी अनेक कारणे आहेत. गेल्या काही वर्षात शहरातील सेनेला लागलेली गळती अद्याप थांबण्यास तयार नाही.  महापालिकेतील या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढण्याऐवजी प्रत्येक पंचवार्षिकला ती घसरतच आहे. सेनेकडे असलेले हडपसर आणि कोथरूड हे दोन्ही मतदारसंघ विधानसभा निवडणूकीत युती तुटल्यानंतर सेनेला घमवावे लागले. 

आजच्या स्थितीला महापालिकेतील अकरा नगरसेवक एवढच काय ते सेनेच्या पदरात आहे. नविन मतदारवर्गही सेनेकडे आकृष्ट होतोय अशीही काय परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत  माजी आमदार बाबर आणि  मोकाटे यांच्याकडे पक्षनेतृत्वाने शहरप्रमुखपदाची जबाबदारी टाकली आहे. या दोघांकडे प्रत्येकी चार मतदारसंघ विभागाकडून देण्यात आले आहेत. पक्षाच्या अधोगतीच्या काळात बाबर आणि मोकाटे यांना शहरप्रमुखपदाचे शिवधनुष्य पेलवावे लागणार आहे.

त्यासाठी या दोघांनाच आधी आता सक्रिय व्हावे लागेल. कारण विधानसभा निवडणूकीत स्वगृही परत आलेल्या विनायक निम्हण यांच्याकडे शहरप्रमुखदाची जबाबदारी सोपविल्यानंतर हे दोघेही माजी आमदार नाराज होते. त्यामुळे गेली जवळपास तीन वर्ष हे दोघेही पक्षात फारसे सक्रिय नव्हते., त्यामुळे आत्ता स्वत:पासूनच त्यांना कामाला सुरवात करावी लागेल. त्यानंतर शिवसैनिकांमधील मळभ दुर करावी लागणार आहे. महापालिकेत होणार्‍या आंदोलना पलिकडे शहरात सेना फारशी सक्रिय नाही. त्यामुळे शहराच्या पातळीवर पक्षाला गती द्यावी लागेल. त्यासाठी शिवसैनिकांना ताकद देऊन पक्षसंघटना मजभुत करावी लागेल. त्यासाठी खरतर पक्षनेतृत्वाकडून ताकद मिळण्याची अपेक्षा आहे. 

आता पुढील अडीच- तीन वर्ष कुठल्याही निवडणूका नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीच्या कामाची मोठी संधी या जोडीपुढे आहे. त्यासाठी शहरातील सर्व पदाधिकार्‍यांना एकत्र घेऊन पुढे जावे लागणार आहे. तरच पुढील विधानसभा निवडणूकीत सेनेला विरोधी पक्षांशी दोन हात करता येईल. खरतर बाबर आणि मोकाटे यांचा त्यांच्याच मतदारसंघात कस लागणार आहे. मोकाटेंचा कोथरूड मतदारसंघातील मतदारवर्ग हा भाजपला मानणार आहे.  

अशा परिस्थितीत पुन्हा भाजपशी लढत देऊन त्यांच्या ताब्यातून हा मतदारसंघ परत आणणे हे मोठे आव्हान ठरेल. अशीच अवस्था बाबर यांच्या हडपसर मतदारसंघात आहे. विधानसभा निवडणूकी पाठोपाठ पालिका निवडणूकीत या पक्षाने याठिकाणी मोठा जनाधार मिळविला आहे. त्यामुळे बाबरांचाही कस लागणार आहे. त्यामुळे घराच्या मतदारसंघातही या जोडीला अडकून पडावे लागेल अशी अवस्था आहे. त्यामुळे आगामी काळात बाबर व मोकाटे हे सेनेला बळ देणार की बळीचा बकरा बनणार याबाबत उत्सुकता आहे.