Wed, Aug 12, 2020 13:08होमपेज › Pune › देहूत तुकाराम बीज सोहळा उत्साहात

देहूत तुकाराम बीज सोहळा उत्साहात

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:36AMदेहूगाव : उमेश ओव्हाळ

कीर्तन चांग कीर्तन चांग । होई अंग हरिरूप ॥ तुकाराम बीज सोहळ्यात प्रयाणाच्या अभंगाच्या या ओळी कानावर पडताच गोपाळपुर्‍यात एकवटलेल्या लाखो वैष्णवांनी ‘तुकाराम-तुकाराम’चा नामघोष करीत नांदुरकी वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली अन् तुकाराम बीजेचा 370 वा अनुपम सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी देहूत राज्यभरातून सुमारे साडेतीन लाख भाविक दाखल झाले होते. इंद्रायणी घाटावर वैष्णवांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पांढराशुभ्र पोषाख, गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळी अष्टगंध; त्यावर आबीर-बुक्क्याचा टिळा लावून वैष्णव मुख्य मंदिरात दर्शनास दाखल होत होते.  

संस्थानच्या वतीने सोहळ्यानिमित्त विविध मंदिरांमध्ये महापूजा, अभिषेक, काकडा आरती आदी धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त सुनील दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते काकडा आरती; तसेच ‘श्रीं’ची महापूजा झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता शिळामंदिरात अभिजित मोरे,  सुनील मोरे, विठ्ठलमहाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली.

सकाळी सहा वाजता वैकुंठगमन स्थान मंदिरात विश्‍वस्तांच्या हस्ते अभिषेक व महापूजा झाली. सकाळी दहाच्या सुमारास मुख्य मंदिरातील अहिल्या भजनी मंडपात संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. परंपरेप्रमाणे कल्याणकर दिंडीचे विणेकरी पद्माकर लेले यांनी अभंग सादर केला. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखीने वैकुंठगमन स्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. महाद्वार, वैकुंठगमन स्थान मंदिर आणि नांदुरकी वृक्षाचा पार आकर्षक फुलांनी सजविला होता. 

सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी वैकुंठगमन स्थान मंदिराजवळ पोहोचली तेव्हा पालखीला हात लावून दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी वैकुंठगमन स्थान मंदिराच्या प्रांगणात ठेवण्यात आली. कानसुरकर, गिराम, शिंदे या चोपदारांनी पालखीतील पादुका डोक्यावर घेतल्या. मंदिरात तुकाराम महाराजांच्या मूर्तीसमोर त्या विराजमान केल्या. खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, संस्थानचे विश्‍वस्त अभिजित मोरे, तसेच प्रांत अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार गीतांजली शिर्के यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती केली. वैकुंठगमन स्थान मंदिरासमोर कीर्तन मंडपात ह.भ.प. बापूसाहेब देहूकर आणि सहकार्‍यांचे कीर्तन सुरू होते. 

घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्यां हाति ।
मुक्त आत्म स्तुती सांडविन ॥
या अभंगावर कीर्तन रंगले.  
कीर्तन चांग कीर्तन चांग। 
होई अंग हरिरूप ॥  

या अभंगावर निरूपण करण्यात आले.   
वाढवेळ झाला उभा पांडुरंग ।
वैकुंठे श्रीहरी बोलवितो ॥ 

या अखेरच्या ओव्यांनी बाराच्या सुमारास कीर्तनाची समाप्ती झाली आणि पुंडलिक वरदे... हरि विठ्ठल... असा एकच नामघोष झाला. उपस्थित लाखो भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली आणि बीज सोहळा संपन्न झाला.