Sat, Sep 19, 2020 17:44होमपेज › Pune › पुण्यात उच्चांकी 358 नवे रुग्ण

पुण्यात उच्चांकी 358 नवे रुग्ण

Last Updated: May 23 2020 12:38AM

संग्रहित छायाचित्रपुणे ः पुढारी वृत्तसेवा

पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी 358 नवे रूग्ण आढळले असून, दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला. नवे रूग्ण आढळण्याची आजपर्यंतची ही सर्वाधिक संख्या असल्याने प्रशासन हादरले आहे.  सात मे पासूनच रोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्यातील तिसर्‍या व चौथ्या लॉकडाऊनच्या काळात काही बाबतीत बंधने कमी करण्यात आली. या शिथिलतेचा फायदा घेत अनेक पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्याचा थेट परिणाम रुग्ण वाढीवर झाला. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता 5 हजाराहून अधिक झाली आहे.

कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या परिसरातही आता नवीन बाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवशी दोनशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. आज तर त्याचा उच्चांक झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील 317, तर पिंपरी चिंचवडमधील 14 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 257 झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत सध्या एक हजार 786 रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, त्यांच्यापैकी 168 जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर असलेल्यांपैकी 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या 285 झाली आहे. संशयित 141 रुग्ण वायसीएममध्ये दाखल झाले आहेत. 683 नागरिकांना क्‍वारंटाईन करण्यात आले असून, 20 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ससून रुग्णालयात शुक्रवारी सात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली. ससूनमध्ये आतापर्यंत 128 जण मृत्युमुखी पडले. सध्या ससूनमध्ये 111 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोंढव्यातील पुरुष (वय 33), पर्वती येथील पुरुष (70) व पुरुष (62), गंजपेठेतील महिला (72), घोरपडीमधील महिला (45), नानापेठेतील पुरुष (48) व केशवनगर येथील पुरुष (56) या रुग्णांचा समावेश आहे. नानापेठेतील पुरुष (40), गुलटेकडी येथील महिला (70), भिमपुरा कॅम्प परिसरातील महिला (69), बंडगार्डन येथील पुरुष (80), येरवड्यातील पुरुष (90),  भवानीपेठ मधील पुरुष (93) व  यशंवतनगर येरवडा येथे राहणारी महिला (57) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ससूनमध्ये डॉक्टरचा मृत्यू कोरोनामुळे एका 56 वर्षीय डॉक्टरचा ससूनमध्ये शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांना किडनीविकार, हृदयविकार हे आजार होते.  ते घोरपडे पेठ येथे प्रॅक्टिस करत होते. जिल्ह्यात कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांना ससूनमध्ये उपचारासाठी 13 मे रोजी दाखल केले होते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ससूनने दिली.  कोरोनातून बरे होण्यासाठी सांधेवात (हृमेटाईड अर्थरायटीस) साठी वापरले जाणारे एक औषध दिले होते.

एकूण कोरोनाबाधित 5 हजारावर;  दिवसात 15 बळी
 

 "