होमपेज › Pune › आज ‘पोलिओ’ लसीकरण मोहीम

आज ‘पोलिओ’ लसीकरण मोहीम

Published On: Mar 11 2018 1:03AM | Last Updated: Mar 10 2018 11:12PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात रविवारी (दि. 11) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी 855 लसीकरण केंद्रांमार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आठ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 53 वैद्यकीय अधिकारी आदींच्या निरीक्षणाखाली हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली. 

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या सत्राचे आयोजन आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे.

महापालिका परिसरात 855 लसीकरण केंद्रांमार्फत आठ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 53 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली कर्मचारी कार्यरत असणार आहेत. 193 पर्यवेक्षक व 2734 लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, महापालिका क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्ल्यू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

महापालिकेने शहरातील 5 वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी आदी 766 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी 31 ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 58 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटिंग आदी माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. मोहिमेसाठी 53 वैद्यकीय अधिकारी, 193 पर्यवेक्षक व 2734 लसीकरण कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.