Thu, Jun 04, 2020 07:05होमपेज › Pune › कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोथरूडमध्ये सर्वंकष मोहीम : चंद्रकांत पाटील 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोथरूडमध्ये सर्वंकष मोहीम : चंद्रकांत पाटील 

Last Updated: Mar 28 2020 5:09PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आ. पाटील यांनी शनिवारी स्वत: विविध परिसरात सोसायटींमध्ये निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करून घेतली. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच विविध भागात निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांच्या वतीने कोथरूडमध्ये गरजू मजूर, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन आणि औषध वाटप केले जात आहे. तसेच शनिवारी आ. पाटील यांनी मतदार संघातील विविध भागात सोसायट्यांना भेटी देऊन निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करून घेतली. यावेळी आ. पाटील यांच्यासह नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी आदी उपस्थित होते. सर्व मतदारसंघात टप्प्याटप्प्याने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पोळीभाजी केंद्राचा बॅचलर्सना फायदा

आ. पाटील यांनी कोथरुडमध्ये पाच रुपयांत पोळीभाजी केंद्र सुरु केले असून, याचा फायदा कोथरुडमधील बॅचलर तरुण आणि विद्यार्थ्यांना मिळत आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर वयोवृद्धांना भोजन व औषधे घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कोथरुडमधील अनेकांनी आभार मानले आहेत. 

सत्तेत असो किंवा नसो, कायमच जनहिताची धोरणे राबविणे आणि त्यासाठी तळागाळात जाऊन कार्यरत राहणे, ही भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींची विचारसरणी आहे. याच दृष्टिकोनातून कोथरूडमध्ये कोरोना संसर्ग संकटसमयी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय निकषांनुसार सोशल डिस्टन्स सारख्या सर्व खबरदारीचे पालन केले जात आहे. पक्षाचे राज्यातील सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधी अशाच जनताभिमुख उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत.                 

आ. चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप