Wed, Aug 12, 2020 03:48होमपेज › Pune › धरणात तिघांचा मृत्यू  

धरणात तिघांचा मृत्यू  

Published On: May 20 2019 1:42AM | Last Updated: May 20 2019 1:42AM
इंदोरी : वार्ताहर 

मावळ जाधववाडी येथील धरण परिसरात सुटीनिमित्त फिरायला आलेले 5 जण धरणात बुडाले. पैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोघांना वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले.ही दुर्घटना रविवारी (दि. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. 

अनिल कोंडिबा कोळसे (58, रा. घाटकोपर, मुंबई), प्रीतेश रघुनाथ आगळे (32, रा. घाटकोपर, मुंबई), प्रशील अमोल आढाव (8, रा. वाशी, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तर, दादासाहेब गायकवाड (43, रा. येलवाडी, ता. खेड) स्मिता आढाव या दोघांचे प्राण वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब गायकवाड यांनी सुटीनिमित्त आलेल्या पाहुण्यांसमवेत रविवारी जाधववाडी येथील धरण परिसरात पर्यटनाचे नियोजन केले. गायकवाड, त्यांच्या पत्नी संगीता, मुलगी उत्कर्षा, बहीण छाया कोळसे, तिचे पती अनिल कोळसे, भाची स्मिता आढाव, तिचा मुलगा प्रशील आढाव, जावई प्रीतेश आगळे असे सर्वजण मारुती अल्टो कार आणि रिक्षामधून जाधववाडी धरण परिसरात फिरायला आले.

धरण परिसरातच एनडीआरएफच्या जवानांचा कॅम्प सुरू आहे. गायकवाड कुटुंबातील हे सर्वजण कॅम्पपासून थोड्या अंतरावर खेळण्यासाठी व फोटो काढण्यासाठी पाण्यामध्ये उतरले. धरणाच्या काठावर हे सगळे बसलेले असताना अनिल कोळसे यांचा पाय घसरला आणि ते धरणात बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी दादासाहेब गायकवाड यांनी हात दिला. अनिल यांना पकडत असताना धक्का लागून स्मिता आणि प्रशील हेदेखील पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी जावई प्रीतेश हे पाण्यात आले. मात्र, प्रीतेश कुणालाही वाचवू शकले नाहीत. किंबहुना तेही बुडू लागले. संगीता आणि त्यांची मुलगी उत्कर्षा या दोघी सर्वांना वाचविण्यासाठी पुढे सरसावल्या.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक राजमाने, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळके करीत आहेत.

एनडीआरएफच्या जवानांनी दोघांना वाचविले... 

आरडाओरडीमुळे धरण परिसरात मोठा गोंधळ झाला. एनडीआरएफच्या जवानांना हे कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सर्वांना पाण्यातून बाहेर काढले. प्रशील आढाव, अनिल कोळसे, प्रीतेश आगळे, दादासाहेब गायकवाड व स्मिता आढाव यांच्यावर प्रथमोपचाराअंती त्यांना तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविले. तिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले व दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.