Thu, Aug 13, 2020 16:27होमपेज › Pune › अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी पसंतीचे केंद्र नाहीच

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी पसंतीचे केंद्र नाहीच

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:16AM

बुकमार्क करा

पुणे : गणेश खळदकर 

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या 12 डिसेंबरपासून ही परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठीची प्रवेशपत्रेदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. परंतु या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्र देताना शासनाच्या आयटी विभागाने अत्यंत ढिसाळ नियोजन केले असून, विद्यार्थ्यांना पसंतीचे तर सोडाच थेट तिसर्‍या प्राधान्याचे केंद्र दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, केंद्र देताना शासनाच्या आयटी विभागाने खोडसाळपणा केल्याचा आरोप करीत परीक्षेसाठी प्रथम प्राधान्याची केंद्र देण्याची मागणी केली आहे.

शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी तीन बॅचचे नियोजन करण्यात आले असून, सकाळी 9 ते 11 दुपारी 12.30 ते 2.30 आणि संध्याकाळी 4 ते 6 असे या वेळेत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी 9 ते 11 या बॅचच्या परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचण्याची वेळ सकाळी 7.30 आहे. त्यामुळे अगदी घराजवळचे केंद्र असले, तरी विद्यार्थ्यांना कसरत करण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत घराजवळचे तर सोडाच विद्यार्थ्यांना तीनशे ते पाचशे किलोमीटर अंतर लांब असणारी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे इतक्या दूर पोहोचायचे कसे, असा प्रश्‍न परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीसाठी 1 लाख 98 हजार 169 विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहेत. विद्यार्थी ज्या शहरातील आहे त्याच शहरात त्याला परीक्षा केंद्र मिळणे अपेक्षित असते. परंतु ज्यांनी पुणे, नगर, सोलापूर असा प्राधान्यक्रम दिला आहे, त्यांना थेट सोलापूरमधील केंद्र परीक्षेसाठी देण्यात आले आहे.

तर, ज्यांनी औरंगाबाद, नाशिक, धुळे असा प्राधान्यक्रम दिला आहे, त्यांना धुळे, तर ज्यांनी धुळे, नाशिक, औरंगाबाद असा प्राधान्यक्रम दिला आहे. त्यांना औरंगाबाद केंद्र देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याचे केंद्रच मिळण्याची अपेक्षा होती. परंतु ते मिळाले नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तसेच जे सध्या सेवेत आहेत, अशादेखील अनेक शिक्षकांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यात महिलांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. या सर्वांचीच हेळसांड  होणार असल्याचे दिसून येत आहे.