Thu, Sep 24, 2020 11:15होमपेज › Pune › शहरात व्हर्टिकल गार्डनचा ट्रेंड रूजतोय

शहरात व्हर्टिकल गार्डनचा ट्रेंड रूजतोय

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:35AM

बुकमार्क करा

पुणे : शंकर कवडे

वाढत्या शहरीकरणामुळे  मोठ्या प्रमाणात जागेचा तुटवडा निर्माण होत चालला आहे. सद्य:स्थितीत झाडांची संख्या घटत असून, सिमेंटच्या जंगलाचा पसारा वाढत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होऊन प्रदूषण, तापमानवाढ मोठी समस्या निर्माण झाली आहे. अपुर्‍या जागेमुळे झाडे लावण्यासही मर्यादा येत असून, यावर उपाय म्हणून शहरात गेल्या काही वर्षांमध्ये व्हर्टिकल गार्डन (उभी बाग)चा ट्रेंड रुजू लागला आहे. कमी जागेत उभ्या पद्धतीने रोपे लावून पर्यावरणाच्या संरक्षणासह प्रदूषण, तसेच जागतिक तापमान रोखण्यासाठी व्हर्टिकल गार्डनचा नवा पर्याय समोर येऊ पाहत आहे.  

शहरात दर वर्षी वाहनांची भर पडत असून, एसी, फ्रीजमधून मोठ्या प्रमाणात घातक वायू बाहेर पडत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषणासह जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन होण्याच्या दृष्टीने व्हर्टिकल गार्डनआधारे प्रत्येकाला पर्यावरणाच्या वाढीस हातभार लावता येणे शक्य होणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या व्हर्टिकल गार्डनचा हा ट्रेंड सध्या विविध कॉर्पोरेट कार्यालये तशीच विविध हॉटेलमध्ये रुजत आहे. लोखंडी पॅनेलवरील फायबरच्या छोट्या कुंड्यामध्ये रोपे लावून हे गार्डन उभारण्यात येते. साधारणत अर्धा ते एक फुटांपेक्षा जास्त न वाढणार्‍या क्लोरोफायटम, ओपियोपोगन, गोल्डन पॅण्डनन्स, सिंघोमिया, कॅलॅडिया अशा विविध प्रकारची रोपेे लावून हे गार्डन तयार करण्यात येते. गार्डन तयार करताना वजनाने जड असलेल्या मातीऐवजी नारळाच्या शेंड्याचा वापर करण्यात येतो. त्यानंतर, तुषार, तसेच ठिंबक सिंचनद्वारे त्याला पाणी, तसेच खतांचा पुरवठा करण्यात येत असल्याने हे गार्डन कमी कष्टामध्ये उभारता येऊ शकते. 

कृषी महाविद्यालयाचे उच्चतंत्रज्ञान फूलशेती प्रकल्पाचे व्यवस्थापक सचिन चव्हाण म्हणाले, की अमेरिका देशात छंद म्हणून तयार करण्यात आलेला हा प्रयोग पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा ठरत आहे. गेल्या काही वर्षांत प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यांसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर, व्हर्टिकल गार्डन हा प्रभावी उपाय ठरू शकतो. हे थोडेसे खर्चिक असून, त्याचा दर गार्डनची सिस्टीम, स्ट्रक्चर, डिझाईन, रोपे, सिंचन प्रणाली, स्थान आदी घटकांवर अवलंबून असतो.

ज्याप्रमाणे शहरातील विविध सोसायट्या, तसेच कंपन्यांना अग्निशामक यंत्रणा लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, व्हर्टिकल गार्डनचा आग्रह करणे ही काळाची गरज झाली आहे. गेल्या काही वर्षांत काचेच्या बिल्डिंगमुळे वातानुकूलित यंत्रणा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामधून निघणार्‍या विविध वायू उत्सर्जनामुळे तापमानात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून काचेच्या बिल्डिंगवरील काही भागावर व्हर्टिकल गार्डन उभारणे क्रमप्राप्त आहे. परिणामी, इमारतीतील तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसने कमी होऊन ते पर्यावरणासाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी सांगितले.