Tue, Jul 07, 2020 17:20होमपेज › Pune › जिल्हा परिषदेतील ठेकेदारांचे ग्रहण सुटणार कधी

जिल्हा परिषदेतील ठेकेदारांचे ग्रहण सुटणार कधी

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 12:06AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्हा परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या वस्तू, लाभार्थ्यांनी ठराविक कंपनीकडूनच खरेदी करण्यासाठी चक्क ठेकेदारांकडून पदाधिकारी आणि अधिकार्‍यांवर दबाव आणला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वस्तूंचे स्पेसिफिकेशनच बदलण्याचा आग्रह ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान, मागील एका महिन्यात विविध विभागातील अधिकार्‍यांच्या केबीनमध्ये वस्तूंच्या स्पेसिफिकेशन बदलासाठी ठेकेदारांनी तासन्तास चर्चेचे गुर्‍हाळ रंगविले होते. ऐन मार्चच्या अखेरीस ठेकेदारांच्या हस्तक्षेपामुळे कामांचा खोळंबा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

शासनाच्या निर्णयानुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात (डीबीटी) वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लाभार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने स्पेसिफिकेशन करण्यात आले. त्यानंतर लाभार्थ्यांकडून वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात आले. मात्र,  स्पेसिफिकेशननुसार एका ठेकेदाराच्या संबंधित कंपनीच्या वस्तूंचे स्पेसिफिकेशन नियमात बसले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने चक्क एका माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मदतीने स्पेशिफिकेशनच बदलण्याची आग्रही मागणी केली. त्यासाठी अधिकार्‍यावर दबाव टाकला. मात्र, लाभार्थ्यांकडून वस्तूंची खरेदी सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे ठेकेदाराच्या अनाठायी मागणीला आणि प्रयत्नांना प्रशासनाने कोलदांडा दिला. 

नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या वस्तूूंचा लाभ त्वरित देण्यासाठी शासनाच्या वतीने डीबीटी यंत्रणा राबविण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि ठेकेदारांनी खरेदी केलेल्या निकृष्ट वस्तूंच्या कचाट्यातून लाभार्थ्यांची सुटका करण्यासाठी  शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शासनाच्या निर्णयाला तिलांजली देत वैयक्तिक लाभाच्या योजनेत ठराविकच कंपन्यांद्वारे खरेदी व्हावी यासाठी ठेकेदारांची टोळी जिल्हा परिषदेमध्ये घिरट्या घालत असताना आढळून आली आहे. 

 

Tags : pune, pune news, Pune ZP, contractor,