Tue, Aug 11, 2020 21:38



होमपेज › Pune › ‘आरटीई’च्या बॅचचा प्रश्‍न अनुत्तरितच

‘आरटीई’च्या बॅचचा प्रश्‍न अनुत्तरितच

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:17AM

बुकमार्क करा





पिंपरी : वर्षा कांबळे 

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांची वेगळी बॅच करण्याचा घाट शहरातील एका खासगी शाळेने घातला होता. याबाबत पालक संघाच्या तक्रारीवरून शाळेला महापालिका शिक्षण विभागाने नोटीस पाठविली होती. यावर तोडगा म्हणून शाळेने ‘आरटीई’च्या सतरा मुलांना दुपारच्याच सत्रात ठेवून चार वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये  प्रवेश दिला आहे. यामुळे तुकड्यांचा प्रश्‍न सुटला, तरी बॅचचा प्रश्‍न अनुत्तरितच राहिला आहे. अशाप्रकारे ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे भविष्यात होणार्‍या ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांबाबत इतरही शाळा हाच पायंडा पाडण्याची शक्यता आहे. 

संबंधित शाळेने ‘आरटीई’च्या सतरा मुलांना एकत्र एकाच बॅचमध्ये टाकले होते. ‘आरटीई’च्या कायद्यानुसार मुलांची अशाप्रकारे स्वतंत्र बॅच करणे हे ‘आरटीई’च्या कायद्याचा भंग होत असल्यामुळे, पालक संघाच्या तक्रारीवरून हा प्रकार हाणून पाडला होता. यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेस नोटीस पाठविली होती. या नोटिशीला उत्तर म्हणून शाळेने ज्या ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांची एकत्रित बॅच केली होती. त्या विद्यार्थ्यांना चार तुकड्यांमध्ये प्रवेश देऊन सरसकट दुपारच्या सत्रात टाकण्यात आले. यामध्ये सतरा विद्यार्थ्यांपैकी ज्या पालकांची गैरसोय आहे त्यांना सकाळचे सत्र द्यावे, अशी मागणी केली. मात्र, शाळेने इतर मोठ्या रकमेची फी भरणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले आहे. 

सतरा विद्यार्थ्यांना सकाळचे सत्र द्या असे नाही; पण ज्यांना सकाळची बॅच सोयीस्कर आहे त्यांना तरी द्यावी, अशी मागणी पालकांनी करूनही तुकडी वेगळी; पण बॅच मात्र दुपारचीच घेण्यासाठी पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिक्षण विभाग पालकांची बाजू न घेता शाळा प्रशासनास पाठीस घालत आहे, असा आरोप ‘आरटीई’ पालक संघाकडून केला जात आहे. शाळा प्रशासनाकडून जाणूनबुजून ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे विद्यार्थी 60 ते 70 हजार रुपये भरून शाळेत प्रवेश घेतात त्यांना शाळेकडून प्रथम प्राधान्य दिले जाते;  प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जात असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी संबंधित शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांच्या दोन दिवस रांगा लागत होत्या. त्यामुळे सकाळच्या सत्रात भरमसाट फी देणार्‍या पालकांच्या पाल्याला सकाळच्या सत्रात प्रवेश दिला जात आहे आणि उर्वरित दुपारच्या सत्रात प्रवेश दिले जातात. जर ‘आरटीई’च्या पालकांना निवड करण्याचा अधिकार आणि टोकन देऊनही सरसकट दुपारच्याच सत्रात पाल्यांना प्रवेश का, असा सवाल ‘आरटीई’चे पालक करत आहेत. वेगळी बॅच करून अशाप्रकारे शाळांना ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव करण्याचा कोणातही अधिकार नसताना देखील या विद्यार्थ्यांना अशी अन्यायकारक वागणूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे.