Wed, Aug 12, 2020 09:28होमपेज › Pune › कारागृहात कैद्यांकडून रक्षकाला मारहाण

कारागृहात कैद्यांकडून रक्षकाला मारहाण

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 13 2018 1:05AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कैद्यांच्या बरॅकमधील बिछान्याची झडती घेताना झालेल्या वादातून चार कैद्यांनी तुरुंग रक्षकाला मारहाण केली; तर सोडविण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकार्‍यालाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दरम्यान कारागृहात कैद्यांकडून होणार्‍या मारहाणीच्या आणि वादाच्या घटनांमुळे येरवडा कारागृह सध्या कायमच चर्चेत राहत आहे. दरम्यान या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात चार कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी तुषार नामदेव हंबीर, किरण  भालेराव, अक्षय लक्ष्मण इंगुळकर आणि निवृत्ती पवार (रा. येरवडा, मध्यवर्ती कारागृह) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या संदर्भात नागनाथ जगताप (वय 35, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील कैदी येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. ते कारागृहातील सी /जे/बरॅक क्रमांक 2 येथे आहेत.  फिर्यादी तुरुंग अधिकारी जगताप बुधवारी सायंकाळी त्यांचे सहकारी कारागृह रक्षक रमेश पिसोळे यांच्यासोबत आरोपींच्या बरॅकमध्ये गेले होते. पिसोळे यांनी तुषार हंबीर याच्या बिछान्याची झडती घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी  हंबीर याने बिछाना जोरात झटकला.

त्या वेळी पिसोळे हे बिछाना हळू झटका, धूळ उडत आहे, असे म्हणाले. त्याचा राग आल्याने हंबीर तसेच, इतरांनी पिसोळे यांना मारहाण केली. दरम्यान फिर्यादी जगताप हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. दरम्यान चौघांनी केलेल्या मारहाणीत पिसोळे जखमी झाले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांबाबत कारागृह प्रशासनाला पत्रव्यवहार केला असून, त्यांचीइ फाईल आल्यानंतर ते कोणत्या गुन्ह्यात बंदी आहेत, याची माहिती मिळेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.