Mon, Sep 28, 2020 13:02होमपेज › Pune › जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला

जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला

Last Updated: Jan 14 2020 1:50PM

शरद पवार आणि माजी खासदार उदयनराजेपुणे : प्रतिनिधी 

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन पुस्तक वादाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतंच प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यावरून वादंग उठला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीच्या वारसदारांनी स्पष्ट भुमिका जाहीर करावी आणि भाजपतून राजीनामे देण्याची मागणीही राऊतांनी केली होती. यावर बोलताना उदयनराजेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे. या मुद्यावर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा प्रश्न अनेकदा पडतो, असेही ते म्हणाले. काल जे पुस्तक प्रकाशित झालं, ते ऐकून अत्यंत वाईट वाटलं. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. तसेच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत उदयनराजे म्हणाले की, 'एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. ज्यांना ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. यापुढे बोलताना ते म्हणाले की, 'शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? शिवसेना भवनामध्ये शिवाजी महाराजाच्या वरती बाळासाहेबांचा फोटो का?' असं सवाल करत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. 'सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी, शिववडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं?' असं म्हणत उदयनराजेंनी थेट विचारणा केली आहे.

उदयनराजे म्हणाले की, 'भोसले घराण्यात आम्ही जन्माला आलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. टिका करणाऱ्यांपेक्षा आम्ही नक्कीच जास्त पुण्य केलं आहे, म्हणूनच या घराण्यात आमचा जन्म झाला आहे. तरिही मी कधीच नावाचा दुरुपयोग केला नाही. तसेच पुढे बोलताना त्यांनी थेट महाशिवआघाडीवर निशाणा साधला आहे. महाराजांच्या नावाचं आजपर्यंत फक्त राजकारण करण्यात आलं आहे.

 "