Wed, Aug 12, 2020 13:00होमपेज › Pune › प्रदूषण घटल्याने मान्सूनने 10 दिवस आधीच देश व्यापला 

प्रदूषण घटल्याने मान्सूनने 10 दिवस आधीच देश व्यापला 

Last Updated: Jun 26 2020 11:01PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यामुळे प्रदूषण घटले. त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर  झाला आहे. दरवर्षी 8 जुलैला देश व्यापणारा मान्सून यंदा चक्क दहा दिवस आधीच म्हणजे 26 जूनला संपूर्ण देशात पोहोचला आहे. असा अनुकूल बदल गेल्या कित्येक वर्षात प्रथमच दिसून आला आहे.

भारतीय हवामानाशास्त्र विभागाने शुक्रवारी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असल्याचे जाहीर केले. यावर्षी केरळमध्ये 2 जून तर महाराष्ट्रात 13 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. 

त्यानंतर मान्सूनला उत्तरेकडे प्रवास करण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याने गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली जम्मू काश्मीर आणि लडाखपर्यंत 25 जूनला मान्सून पोहोचला. 

पोषक स्थितीचा परिणाम 

पोषक वातावरणाबरोबरच चक्रीय स्थिती आणि बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रामध्ये  तयार झालेले कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामामुळे मान्सूनने सरासरीपेक्षा दहा दिवस आधीच देश व्यापला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार  8 जुलै आसपास मान्सून देश व्यापत असतो. 
- अनुपम कश्यप,
हवामानप्रमुख, पुणे वेधशाळा.