Mon, Aug 10, 2020 04:08होमपेज › Pune › पालिका सर्वसाधारण सभेत चर्चेचा सर्वाधिक भर चिंचवड मतदारसंघावर

पालिका सर्वसाधारण सभेत चर्चेचा सर्वाधिक भर चिंचवड मतदारसंघावर

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:19AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील 32 प्रभागातून तब्बल 128 नगरसेवक लोकांचे प्रतिनिधित्व  महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटावे, अशी नागरिकांची साधी अपेक्षा आहे. मात्र, शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ चिंचवड भागांवरच अधिक चर्चा होत असल्याचे समोर येत आहे. परिणामी, पिंपरी व भोसरी मतदारसंघ शहरातून वगळला की काय असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

पाणी टंचाईचे कारण देत चिंचवड मतदार संघातील काही ठराविक भागांतील मोठ्या गृहप्रकल्पांना तात्पुरता बांधकाम परवाना बंदीचा निर्णय स्थायी समितीने मंजुर केला आहे. त्यावरून विरोधकांनी विशेषत: केंद्र व राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपवर तिखट आरोप केले आहेत. त्याचे पडसाद शुक्रवारी (दि.22) झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले. 

केवळ चिंचवड मतदारसंघातील ठराविक भागात बांधकाम परवानावर बंदी घालण्यावर प्रश्‍नचिन्ह सभेत उपस्थित केले गेले. निवडणुकीत अनधिकृत बांधकाम व शास्तीकराचा प्रश्‍न सोडविण्याचा आश्‍वासन भाजपच्या नेत्यानी दिले होते. मात्र, भाजपला राज्यात चार वर्षे उलटूनही ते पूर्ण झालेले नाही, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता अनेकांनी केली.  

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह सचिन भोसले यांनी जगताप यांचे नाव न टीका केली. जोपर्यंत राज्य शासनाचा अध्यादेश येत नाही, तोपर्यंत तो प्रश्‍न सुटला असे, म्हणता येणार नाही, असे म्हणत  विरोधी पक्षनेते दत्ता साने, अजित गव्हाणे, योगेश बहल यांनीही  टीकेची धार वाढविली. भाजपसह जगताप यांना लक्ष्य केले. 

आ. जगताप आणि चिंचवड संघातील निर्णयावरील टीकेस सत्ताधार्‍यांनी तितक्याच त्वेषाने प्रत्त्युतर दिले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अभिषेक बारणे, शत्रुघ्न काटे, सीमा सावळे यांनी आ. जगतापांची पाठराखण करीत बांधकाम परवाना बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. पवार यांनी केंद्र ते राज्यापर्यंत भाजपचा पारदर्शक कारभाराचा उल्लेख करीत, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. आ. जगतापांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळेच  अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा निर्णय शासनाचे घेतला. तसेच, शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णयही त्यांच्या प्रयत्नामुळेच झाल्याचा दावा केला. आ. जगताप हे शहराचा विचार करतात असल्याने त्यांचा निर्णयाचे समर्थन करीत काटे यांनी चिंचवड मतदार संघात केवळ 40 टक्केचे पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. पाण्याचा खासगी टॅकरवर गरज भागवावी लागत आहे.

चर्चा शहराच्या संबंधित विषयावर असली तरी, ती चिंचवड मतदारसंघाभोवती फिरत होती. त्यामुळे शहरात पिंपरी व भोसरी मतदारसंघच अस्तित्वात नाही का, प्रश्‍न निर्माण होत आहे. पिंपरी व भोसरी मतदारसंघातील नगरसेवक चर्चेत सहभागी होत असले तरी, ते फारसे प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे.