Mon, Aug 10, 2020 05:17होमपेज › Pune › गटबाजी करणार्‍याला महत्त्व न देण्याची खेळी !

गटबाजी करणार्‍याला महत्त्व न देण्याची खेळी !

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:23AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील गटबाजी उफाळूनही शहर भाजपच्या नेते मंडळींनी सध्या गप्प राहणेच पसंत केले आहे. गटबाजी करणार्‍यांना महत्त्व न देता त्यांच्याबाबत पक्ष योग्यवेळी काय तो निर्णय घेईल, असे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. महापालिकेत पहिल्यांच एखादा पक्षाचे एवढ्या संख्येने नगरसेवक निवडून येण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, भाजपच्या या यशाला पालिका निवडणुकीच्या वर्षपूर्तीपूर्वीच ग्रहण लागले आहे. महापालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. 

त्यात खासदार संजय काकडे समर्थक नगरसेवकांचा एक गट असून, या गटाने महापालिकेत पक्षविरोधी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. समान पाणीपुरवठा योजना व सायकल योजना या दोन्ही योजना मंजूर करण्याची पक्षाची भूमिका असतानाच या गटाने मात्र त्याविरोधात भूमिका घेतली आहे. एवढ्यावरच न थांबता नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यात अधिकच भर टाकण्याचे काम सुरू आहे.

पक्षातील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन होऊ लागले आहे. मात्र, असे असताना या गटबाजीला आळा घालण्यासाठी पक्षाकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलेले गेले नसल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या सर्व प्रकारांकडे काणाडोळा केला आहे. तर, पालिकेतील पदाधिकार्‍यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे पक्षामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत पक्षाकडून ठोस पावले उचलून कार्यवाही करण्याची अपेक्षा काही नगरसेवक आणि कार्यकत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे

पालकमंत्री बापट यांचे शहरात लक्ष नाही, शहराध्यक्षांचे कोणी ऐकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुण्यात लक्ष घालावे लागते, आता गटबाजीच्या प्रकरणावर त्यांनीच लक्ष घालावे, अशी अपेक्षा एका भाजप पदाधिकार्‍याने व्यक्त केली.

...त्यांना पण ‘मीटर‘ लावायचाय

समान पाणी योजना भाजपमधील गटबाजीला कारणीभूत ठरली आहे. या योजनेत मोठा आर्थिक गोलमाल आहे. त्यामुळे एका नेत्याला या योजनेच्या माध्यमातून स्वत:चा आर्थिक मीटर लावायचा असल्यानेच त्यासाठीच हे सर्व सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीचेही चित्रीकरण ? 

शनिवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीचे चित्रीकरण आणि  रेकॉर्डिंग काही नगरसेवकांनी केले आहे. तसेच बैठकीस उपस्थितांची यादीही तयार करण्यात आली आहे. योग्य वेळेस ती संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.