Sun, Aug 09, 2020 12:03होमपेज › Pune › ‘एमबीए’प्रवेशाचा गोंधळ संपेना

‘एमबीए’प्रवेशाचा गोंधळ संपेना

Published On: Aug 21 2019 1:49AM | Last Updated: Aug 21 2019 1:49AM
पुणे : प्रतिनिधी 

व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, तिच्यावर 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेला स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. 

राज्यातील तंत्र व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया राबविण्यात ‘सार’ प्रणाली अपयशी ठरल्याने सरकारने विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी महासीईटी व तंत्रशिक्षण संचालनालयावर सोपविली होती. त्यानंतर एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपावर मुंबईतील स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांनी जागावाटपात ‘महासीईटी’ने स्वायत्त दर्जा ग्राह्य धरला नसल्याचे निदर्शनास आणून देत मुंबई उच्च न्यायालयात प्रवेश प्रक्रियेला आव्हान दिल्याने न्यायालयाने नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेशही रद्द करण्यात आले. 

पहिल्या फेरीतील प्रवेश रद्द झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे पुन्हा नव्याने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ‘एमबीए’च्या प्रवेश प्रक्रियेला अतिविलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या एमबीए प्रवेश प्रक्रियेमुळे एमबीएच्या प्रथम सत्रातील परीक्षा आणि प्रथम वर्षातील इंटर्नशिपही लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संधी गमविण्याची भीती निर्माण झाली आहे. 

‘पीजीडीएम’साठीच रखडवली प्रक्रिया

एमबीए प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पीजीडीएम या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतला आहे. हा अभ्यासक्रम अनेक महाविद्यालये थेट अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) परवानगीने स्वायत्त पद्धतीने चालवत आहेत. महाविद्यालयांना त्यासाठी संलग्न विद्यापीठांची मान्यता घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे ‘पीजीडीएम’च्या प्रवेशासाठीच प्रवेश प्रक्रिया रखडवली असल्याची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात सुरू आहे.