Wed, Aug 12, 2020 21:34होमपेज › Pune › सिंहगडाच्या कल्याण दरवाजाचे बुरुज धोकादायक

सिंहगडाच्या कल्याण दरवाजाचे बुरुज धोकादायक

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:37PMखडकवासला : वार्ताहर

सिंहगडाच्या कल्याण दरवाजाचे ठिसूळ झालेले बुरूजांचे दगड  कोसळू लागले आहेत. तसेच, पुणे दरवाजाजवळील दुरदर्शन मनोर्‍या शेजारील  दरडी ठिसुळ झाल्या आहेत. पावसात बुरुज, दरडी कोसळण्याचा धोका असल्याने पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. असे असले तरी हौशी, उत्साही तरूण-तरूणी बुरुज, तटबंदीवर चढून सेल्फी फोटो काढत आहेत. त्यामुळे बुरुज, तटबंदीवरून खोल दरीत पर्यटक कोसळण्याचा धोका आहे. 

दरम्यान, राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याने सिंहगडाच्या डागडुजीच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून कामाचा आराखडा तयार केला जात आहे. कल्याण दरवाजाच्या धोकादायक बुरूजांच्या दुरूस्तीचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार असल्याचे पुरातत्व खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक विलास वाहणे यांनी सांगितले. गडावरील तटबंदीत, बुरूजांवरून पर्यटकांनी   चढू नये. पावसामुळे गडावरील तटबंदी, बुरूजांच्या वाटा निसरड्या  झाल्या आहेत. पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पुरातत्व तसेच वन खात्याने केले आहे.

शनिवार, रविवार तसेच इतर दिवशीही हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगडावर गर्दी करत आहेत. सध्या जोरदार पाऊस पडत नसला तरी तुरळक प्रमाणात पडत असलेल्या पावसात पावसाळी पर्यटनांचा आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगडावर गर्दी करत आहेत. गडाच्या घाट रस्त्यावर धोकादायक दरडी कोसळून लागल्या आहेत. उंच  कड्यातील धोकादायक दरडी संरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र, निधीअभावी उर्वरित दरडी संरक्षित करण्याचे काम रखडले आहे. 

पुणे दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या दुर्गदर्शन मनोर्‍याजवळील दरडी ठिसूळ झाल्या आहेत. जोरदार पावसात दरडीचे दगड पाण्याच्या प्रवाहासह कोसळत आहेत. गेल्या चार पाच वर्षांपासून येथील दरडी धोकादायक बनल्या आहेत.पुणे  दरवाजामार्गे ये जा करणार्‍या पर्यटकांवर दरडीचे दगड कोसळून पर्यटक जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक  कार्यकर्ते  अमोल पढेर म्हणाले ,  चार वर्षांपूर्वी   कल्याण दरवाज्याची दुरूस्ती करण्यात आली. मात्र,  बाजूच्या बुरूजांचे  दगड ठिसूळ झाले आहेत. दगड उन्मळले आहेत.  दरवाज्यात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. जोरदार पावसात बुरूजांचे  दगड कोसळण्याचा धोका आहे. सिंहगडाचे दरवाजे, तटबंदी, बुरुज तसेच मार्गाची तज्ज्ञांमार्फत पाहणी करून डागडूजी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे व जिल्हा कल्याण समितीचे सदस्य बाजीराव पारगे यांनी केली आहे.