Wed, Aug 12, 2020 20:14होमपेज › Pune › उच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा 

उच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा 

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:25AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

विज्ञानाचा गावोगावी प्रसार करण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (नासी) या संस्थेच्या पुणे शाखेने पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या गावच्या शाळेत जाऊन शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा करून दिला.

ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विद्यापीठात शिकत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ग्रामीण भागात उपयोग होऊ शकतो. तेथील विद्यार्थ्यांना तसेच, शिक्षकांनाही अभ्यासात मदत होऊ शकते. त्याचबरोबर आपल्याच शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असल्याचे पाहून बर्‍याच मुलांना प्रेरणाही मिळते. हाच उद्देश डोळ्यासमोर धरून पुणे विद्यापीठ आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (नासी) या संस्थेने मिळून गावच्या शाळेत शिकवा हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातील शाळेत शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यानुसार हे विद्यार्थी मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवतात, वेगवेगळे प्रयोग व उपक्रम करून दाखवतात, त्यासाठी लागणारी साधनेही पुरवतात. या विद्यार्थ्यांना लागणारी सर्व प्रकारची मदत विद्यापीठ व ‘नासी’तर्फे केली जाते. याशिवाय त्यांना हे करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून गावच्या शाळेत जाण्यायेण्याचा प्रवास खर्च आणि मानधन म्हणून प्रति व्याख्यान पाचशे रुपये दिले जातात. त्याचा लाभ बीड, गोंदिया, नांदेड, अमरावती, पुणे अशा जिल्ह्यांमधील काही शाळांना झाला आहे. अशी माहिती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि ’नासी’च्या पुणे शाखेच्या समन्वयक डॉ. दीपाली मालखेडे यांनी दिली.

इतर राज्यांमधील विद्यार्थीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. ते या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत जाऊन शिकवू शकतात. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि त्याची उपयुक्तता पाहता, तो उच्च शिक्षण घेणार्‍या इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ववाऽलहशार्.ीपर्ळिीपश.रल.ळप  या ई-मेलवर संपर्क साधावा. त्यावर विद्यार्थी-शिक्षक आपल्या सूचनाही कळवू शकतात, असेही डॉ. मालखेडे यांनी सांगितले.