Tue, Jun 02, 2020 23:17होमपेज › Pune › मोबाईलवर लाईव्ह रेकॉर्डींग करत मुलाची आत्महत्या

मोबाईलवर लाईव्ह रेकॉर्डींग करत मुलाची आत्महत्या

Last Updated: Dec 03 2019 7:55PM
पुणे : प्रतिनिधी

मोबाईलवर लाईव्ह रेकॉर्डींग करत मोबाईलच्या आहारी गेलेल्या अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सध्याच्या कालावधीत मुले किती मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या विळख्यात अडकली जात आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. रविवारी सकाळी घरात कोणीही नसताना त्याने घराच्या छताला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करतेवेळी त्याने मोबाइलवर लाईव्ह रेकॉर्डींग केल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणारा मुलगा बिबवेवाडी येथे आपल्या आजीसमवेत राहत होता. संबंधित मुलगा सातत्याने मोबाईलमध्ये गेम खेळण्यात व टिकटॉक व्हिडिओ बनविण्यात वेळ घालवित होता. मोबाईलचे व्यसन त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात जडले होते की, त्यामुळे तो  दहावीच्या परीक्षेत अनुउत्तीर्ण देखील झाला होता. त्यामुळे त्याची आजी त्याला मोबाइलपासून दूर राहाण्यास तसेच अभ्यास करण्याचे वारंवार सांगत होती.  परंतू तो  आजीचे ऐकत नव्हता. काही दिवसापूर्वी  त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याची आई त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे  आजीच त्याचा संभाळ करत होती.

आत्महत्या केलेल्या मुलाने काही दिवसांपूर्वी नवा मोबाईल घेतला  होता. तेव्हापासून तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याची आजी त्याला नेहमी समजावून अभ्यास करण्यास सांगत होती. मात्र तो त्याकडे लक्ष देत नव्हता.

त्याने नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र त्याला मोबाइल गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे घरच्यांकडून कळत आहे.
 कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक