पुणे : पुढारी वृत्तसेवा
'ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे.' अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी (ता.२७) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली.
या बैठकीला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीनंतर दांडेगावकर म्हणाले, ऊसतोड कामगार मुकादमाच्या आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो. यंदाचा करार २०२०-२१ ते २०२२-२३ पर्यंत तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना ३५ ते ४५ रुपयांची रक्कम वाढवून मिळणार आहे.
राज्यातील साखर कारखान्यांना या दरवाढीसाठी सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये गतवर्षीच्या तुलनेत अधिक द्यावे लागणार आहेत. सर्व संघटनांनी या निर्णय आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे. महाराष्ट्राला मान्य होणारा हा तोडगा करण्यात आला आहे. राज्यातील गाळप हंगाम सुरु झाला आहे.