Wed, Aug 12, 2020 09:54होमपेज › Pune › जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांचा भर

जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांचा भर

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:08AMपुणे : गणेश खळदकर 

जागतिकीकरणांनतर अनेक जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी कंपन्यांनी भारतात आपले व्यवसाय उभारले, तसेच नोकरी व्यवसायानिमित्त भारतीय विद्यार्थीही परदेशात कूच करू लागले. शैक्षणिक, केपीओ, कॉर्पोरेट, पर्यटन, परराष्ट्रीय व्यवहार अशा विविध क्षेत्रांत इंग्रजीबरोबरच परकीय भाषा येणारे व्यावसायिक आणि भाषातज्ज्ञ यांची मागणी वाढते आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा कोणती भाषा शिकण्याकडे कल आहे हे जाणून घेण्याचा ‘दैनिक पुढारी’ने प्रयत्न केला असता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जर्मन भाषा शिकण्यास प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर, भारताकडे जर्मनी, फ्रान्स, दक्षिण अमेरिकन देश व जपान असे देश ‘उद्योग-व्यापाराच्या संधींचा प्रदेश’ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे या देशांतल्या मोठमोठ्या कंपन्यांनी भारतात आपला व्यवसाय उभारला आहे आणि भविष्यातही उभारणार आहेत. त्यामुळे दोन कंपन्यांमधला व्यावसायिक संवाद उत्तम प्रकारे घडावा, यासाठी कंपन्यांना दुभाषिक हवे असतात. त्यामुळे परकीय भाषातज्ज्ञ- जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी आदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी निर्माण होते. गेल्या काही वर्षांमध्ये परकीय भाषा अर्थात ‘फॉरेन लँग्वेज’ शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या फ्रेंच भाषेच्या समन्वयक डॉ. उज्ज्वला जोगळेकर म्हणाल्या, विभागात जर्मन, फे्रंच, जपानी, रशियन, स्पॅनिश या भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा व पदवी अशा तीन प्रकारात शिक्षण दिले जाते. त्यासाठी वेगवेगळी अर्हता आहे. जी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येते. विभागात नाममात्र शुल्कामध्ये या भाषा शिकण्याची संधी आहे. त्यामुळे शुल्क ही विद्यार्थ्यांची गुंतवणूक नसून त्यांनी भाषा शिकण्यासाठी दिलेला वेळ आणि वर्गातील दैनंदिन हजेरी तसेच मन लावून केलेला अभ्यास हीच विद्यार्थ्यांची खरी गुंतवणूक असते. विभागात शिकत असणारे विद्यार्थी हे अगोदर जर्मन भाषेला त्यानंतर फ्रेंच आणि मगच इतर भाषांना प्राधान्य देतात. कोणतीही भाषा सोपी अथवा अवघड नसते फक्त विद्यार्थी ती भाषा कशी शिकतात, यावरच त्या भाषेतील त्यांचे प्रावीण्य ठरलेले असते.

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अ‍ॅण्ड इंडियन लँग्वेजेसचे संचालक शिरीष सहस्त्रबुध्दे म्हणाले, पुणे हे पारंपरिकरीत्या इंजिनिअरिंग उद्योगांचे केंद्र आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील अनेक कंपन्या फार पूर्वीपासूनच पुण्यात आहे. नेमक्या याच क्षेत्रात जर्मन तंत्रज्ञानाचा वरचष्मा राहिलेला आहे. पुण्यातील जवळपास 300 पेक्षा अधिक कंपन्या या जर्मनीशी सहकार्य करून उद्योग करणार्‍या आहेत. फे्रंच कंपन्यांची संख्या साधारण 51 ते 52 आहे. कोरिया आणि जापनिज कंपन्यांची संख्या 40 ते 45च्या आसपास आहे. त्यामुळे जर्मन कंपन्यांशी सहकार्य असलेल्या कंपन्या मोठ्या प्रमाणात पुण्यात असल्यामुळे जर्मन भाषा येणार्‍यांना या कंपन्यांमध्ये प्राधान्य दिले जाते.

त्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. जर्मननंतर फे्रंच या भाषेला महत्त्व आहे. तर जापनीज आणि स्पॅनिश या भाषा सध्या तिसर्‍या क्रमांकावर आहेत. साधारण 2017-18 या वर्षात 1 हजार 378 विद्यार्थ्यांनी एकूण सहा भाषा शिकल्या आहेत. यामध्ये जर्मन, फे्रंच, स्पॅनिश या तीन युरोपियन भाषा तसेच चायनीज, जापनिज आणि कोरियन या तीन आशियायी भाषा शिकवल्या जातात.