Fri, Nov 27, 2020 23:20होमपेज › Pune › पवारांबद्दलच्या वक्तव्यावर रंगला कलगीतुरा

पवारांबद्दलच्या वक्तव्यावर रंगला कलगीतुरा

Last Updated: Nov 23 2020 1:16AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून रविवारी चांगलाच कलगीतुरा रंगला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही या टीकेला तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तरही दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा  समाचार घेतला. अशाप्रकारची वक्तव्ये करणार्‍यांनी आपली उंची बघून तरी बोलावे, अशा शब्दांत अजित पवार यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला.
पवार यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा उत्तर दिले. भाजप नेत्यांवर महाविकास आघाडीचे नेते वारंवार खालच्या पातळीवर टीका करतात. तेव्हा या नेत्यांची तोंडे का बंद असतात? आम्ही या टीका किती सोसायच्या? असा सवाल पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 21) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर कळले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, असे वक्तव्य पाटील यांनी एका मेळाव्यात केले होते.

पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, कालचे विधान हे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल. ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही त्यांनी काय टीका करावी? शरद पवार यांनी समाज आणि राजकारणात 60 वर्षे काम केले आहे. ते महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे, ते सर्वांनी पाहिले आहे. अशावेळी पाटील यांच्यासारख्यांना त्यांच्याबद्दलचे विधान शोभत नाही.

सत्तेची खुर्ची गेल्याने बुद्धिभ्रंश ः तुपे

चंद्रकांत पाटील यांनी बुद्धीची दिवाळखोरी जाहीर केली आहे. पाच वर्षे सत्तेची उब देणारी खुर्ची गेल्याने होणार्‍या तडफडीतून त्यांना बुद्धिभ्रंशाची बाधा झाली असावी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व आमदार चेतन तुपे यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.

ढेकळांनी हिमालयाशी तुलना करू नये : कोल्हे

खा. शरद पवार यांचे कार्य महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे  ढेकळांनी हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

ते गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का?

पवार यांना अभ्यास नसलेले छोटे नेते म्हणणारे चंद्रकांत पाटील हे गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का? असा पलटवार करीत, एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला.