Thu, Jul 02, 2020 18:29



होमपेज › Pune › शिवकालीन शैलीत वीर मावळ्यांच्या दगडी समाधीचे बांधकाम

स्मारकांच्या खोदकामात समाधिस्थळांना उजाळा 

Published On: Apr 02 2019 2:01AM | Last Updated: Apr 02 2019 1:26AM




खडकवासला : दत्तात्रय नलावडे

पुणे महापालिकेच्या वतीने सहा कोटी रुपये खर्च करून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. नरवीरांचा अर्धपुतळा असलेल्या स्मारकाचे खोदकाम करताना ऐतिहासिक दगडी समाधीचे अवशेष सापडले त्यानंतर अशा वीरांच्या (‘वीरगळी’) दगडी समाधी अडगळीत पडल्याचा प्रश्‍न समोर आला आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीखालील काँक्रिटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्याखाली एक चौकोनी दगड सापडला. त्याखाली समाधी वृंदावनाचे अवशेष सापडले. पुतळ्याशेजारी एका चौकोनी दगडावर या समाधीचा वरील भाग होता. सखोल माहिती घेऊन शेजारील समाधीचा वरील भाग खोदकामात सापडलेल्या समाधीच्या अवशेषावर बसविला असता मूळ समाधी असल्याचे स्पष्ट झाले. या ऐतिहासिक समाधीचे जतन करण्यात आले. 

वीर बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, शिवाजी काशीद आदी वीर मावळ्यांच्या अशाच दगडी चिरेबंदी समाधी छत्रपती शिवरायांनी उभारल्या आहेत. वीर मावळ्यांच्या दगडी समाधीचे बांधकाम शिवकालीन शैलीत आहे. समाधीला स्थानिक बोली भाषेत ‘वीरगळी’ असे म्हणतात. मृतदेहावर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी असलेल्या समाधीस अग्निसमाधी म्हणून ओळखले जाते व जिथे वीर मावळ्यांनी शत्रूशी लढताना बलिदान दिले, तिथे उभारलेल्या समाधीस देहसमाधी म्हणून ओळखले जाते.

या समाधीचे बांधकाम चिरेबंदी दगडात केले जात असे. जमिनीपासून तीन ते सहा फूट उंचीपर्यंत समाधी आहेत. जमिनीलगत चौकोनी मोठा चौथरा, त्यावर मध्यभागी असलेल्या दगडावर वीर मावळ्यांच्या स्मरणार्थ कोरीव काम करून चित्र कोरले जात असे. या चित्रातून वीर मावळ्यांची ओळख होत असे.  

समाधीच्या शिरोभागाच्या कोरीव दगडाची वरील बाजू मध्यभागी उंच गोलाकार निमुळती आहे. त्याच्या बाजूने कमळाच्या फुलांच्या पाकळ्या कोरल्या जात. समाधीच्या मध्यभागी शौर्याचे प्रतीक म्हणून हातात तलवार, ढाल, शस्त्र, घोडा, लढाईचे प्रसंग; तर शिरोभागावर कमळाचे फूल अशी चित्रे कोरली गेली आहेत.