Tue, Jul 07, 2020 18:02होमपेज › Pune › महावितरणपाठोपाठ पोलिसांचा शॉक!

महावितरणपाठोपाठ पोलिसांचा शॉक!

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:21AMपुणे : देवेंद्र जैन

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उघड्या डीपीचा शॉक लागून मरण पावलेल्या बापू मेसा कांबळे या 40 वर्षीय इसमाच्या कुटुंबाची गेल्या महिनाभरापासून परवड सुरू असून, पोलिसांनी याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही.

यासंदर्भात बापू कांबळेचा भाऊ भारत याने सांगितले की, 15 जून रोजी बापूचा शॉक लागून मृत्यू झाला. त्याबाबत मी दत्तवाडी पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली; पण पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. सदर अपघात हा महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाला, असा अभिप्राय गुन्हा दाखल करण्यासाठी गरजेचा आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचेही भारत यांनी सांगितले. 

कांबळे हा त्याचा भाऊ मयत झाला त्या दिवसापासून दररोज दत्तवाडी पोलिस स्थानक व महावितरण कार्यालयाच्या पायर्‍या झिजवत आहे; पण त्यांना कोणीही दाद लागू देत नाही. याप्रकरणी महावितरणचा निष्काळजीपणा असल्याचा दाखला सामाजिक कार्यकर्ते भरत जैन सुराणा यांनी माहिती अधिकारात मिळवून त्याची प्रत महावितरणच्या संबंधित कार्यालय व पोलिस स्थानकामध्ये एक महिन्यापूर्वी देऊनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास चालढकल करत असल्याचे दिसून येते. 

कायद्याप्रमाणे सदर मृताच्या परिवाराला तरतूद असूनही अद्याप मदत देण्यात आलेली नाही. महावितरणच्या तपासणी अहवालामध्ये सदर अपघात हा विद्युत प्राधिकरण अधिनियम 2010 मधील विनियम क्रमांक 12,18,41 व 48 सुरक्षा व विद्युत पुरवठ्यासंबंधीचे उपाय, तसेच मृत व्यक्तीच्या वारसदारांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आहे, असे स्पष्ट आदेश करण्यात आले असताना, आजतागायत कोणतीही नुकसानभरपाई कांबळे याच्या वारसदारांना देण्यात आलेली नाही. पोलिसांनीही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळे कांबळे कुटुंबाची फरपट सुरूच आहे.

मृताच्या पत्नीचे 2011 मध्ये निधन झाले आहे व त्यास 3 मुली व एक मुलगा आहे, ज्यांचा सांभाळ भारत कांबळे हेच करत आहेत. ते स्वतः जनता वसाहत येथे झोपडीत राहात आहेत व अशिक्षित असल्यामुळे त्यांना शासकीय यंत्रणा दादच लागू देत नाही. या बाबत म. रा. वि. वि. कं.चे मुख्य अभियंता यांना ‘पुढारी’ प्रतिनिधीने विचारणा केली असता, माझ्याकडे अर्ज करण्यास सांगा, मी चौकशी करतो असे सरकारी उत्तर दिले. सामान्य माणसाला विद्युत वितरण व पोलिस रोजच शॉक देत असतात, पण ज्या परिवाराचा आधारच गेला, त्यांना शॉक देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न भरत जैन यांनी केला आहे.